पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या @PMOIndia या ट्विटर हँडलवर आलेल्या क्वात्रोची मामासंदर्भातल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. PMOIndia या ट्विटरवरून एक ट्विट करण्यात आला. राफेल करारावर होणाऱ्या आरोपासंदर्भात हा ट्विट होता. राफेल करार आम्ही करतो आहोत यामध्ये कोणताही भ्रष्टाचार नाही, कोणीही क्वात्रोचीमामा नाही, मिशेल नाही. त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल हे धोरण काँग्रेसकडून अवलंबलं जातं आहे. काँग्रेसला न्यायव्यवस्थेच्या निकालांवर अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्यात रस आहे. अशा आशयाचा ट्विट करण्यात आला आहे. या ट्विटवरच नेटकरी चांगलेच भडकले आहेत.
या ट्विटमध्ये जे शब्द वापरण्यात आले आहेत त्यावरून नेटकऱ्यांनी उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. हे भाजपाचे ट्विटर हँडल आहे की पीएमओचे असाच प्रश्न मला पडल्याचे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. पंतप्रधानांनी ट्विटमध्ये अशी भाषा का वापरली? हे त्यांना शोभते का? असाही प्रश्न एका नेटकऱ्याने उपस्थित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी रायबरेली मध्ये एका रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन केले. त्यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी राफेल करार प्रकरणी काँग्रेसने केलेले आरोप फेटाळले आणि त्यानंतर आक्रमक होऊन काँग्रेसच्या टीकेला उत्तर दिले. काँग्रेसचा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे. क्वात्रोचीला यांनीच देशाबाहेर पळवले, हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी क्रिश्चिएन मिशेलला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली आणि भारतात आणले गेले. या आरोपीला वाचवण्यासाठी काँग्रेसने वकील पाठवला असाही आरोप मोदींनी केला. आता त्यांच्या आरोपानंतर ट्विट करण्यात आला. या ट्विटवर नेटकरी चांगलेच भडकले आहेत.