भ्रष्टाचारी नसण्यासाठी दुसऱ्यांदा सत्तेत येणे हाच एकमेव निकष असेल, तर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करण्याचा अधिकार नाही, असे प्रत्युत्तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी दिले.
मोदी पंतप्रधान झाल्यास देशावर महासंकट कोसळेल, या विधानावरून जेटली यांनी पंतप्रधानांवर कडाडून हल्ला चढविला. पंतप्रधानांची आजची पत्रकार परिषद म्हणजे अपयशाची कबुली असल्याचेही ते म्हणाले.
जेटली म्हणाले की, काँग्रेसच्या गेल्या साडेनऊ वर्षांच्या काळात महागाई वाढली. बेरोजगारी निर्माण झाली. त्यासोबत भ्रष्टाचाराचा आलेख उंचावला. त्याची कबुली देत पंतप्रधानांनी स्वत: अपयश मान्य केले.  विकास करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे.
केवळ तर्काच्या आधारे पंतप्रधानांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. येणारा काळ व इतिहास उत्तर देईल, असे गुळगुळीत उत्तर दिले की साऱ्या समस्यांचे समाधान झाले, असेच पंतप्रधानांना वाटते. दुसऱ्यांदा सत्तेत आल्याने भ्रष्टाचाराचे पापक्षालन झाल्याचा दावा पंतप्रधान करतात. त्या धर्तीवर गुन्हेगाराने एखादी निवडणूक जिंकली तर त्यालाही निदरेष ठरवावे लागेल, असा टोला जेटली यांना लगावला.
जेटली म्हणाले की,  चार राज्यात मतदारांनी काँग्रेसला नाकारले. हे केंद्रातील सरकारचेच अपयश आहे. त्याचा उल्लेख पंतप्रधानांनी का केला नाही? महागाईचा फटका ग्राहकांना बसला, पण उत्पादकांना लाभ झाला, हा दावा करणाऱ्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढल्या, यावर तोंड का उघडले नाही? मोदींची पाठराखण करीत जेटली म्हणाले की, निरपराध असतानादेखील सलग अकरा वर्षे चौकशीला सामोरे जाणारे मोदी हे स्वतंत्र भारतातील एकमेव नेते आहेत.
पोलीस, सर्वोच्च न्यायालय, न्यायालयाने नेमलेल्या विशेष चौकशी समितीने मोदींची चौकशी केली. त्यानंतरही मोदीच सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pms farewell press conference turned into a farce jaitley