पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आणि त्यातून ते जनतेच्या अनेक प्रश्नांना उत्तरं देतील असं वाटलं होतं. मात्र त्यांची ही मुलाखत म्हणजे डोंगर पोखरुन उंदीर काढला असा प्रकार होता अशी खोचक टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांची संपूर्ण मुलाखत देशातील जनतेला पडलेल्या प्रश्नांना उत्तर न देत मी-मी करणारी आणि माझं महत्त्व किती आहे ते सांगणारी अशी होती. ज्याचा काहीही उपयोग झाला नाही असेही सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

५५ महिन्यांत काय काय केले हे कदाचित सांगतील किंवा येत्या काळात काय योजना आहे ते उघड करतील. मात्र मुलाखतीत मी आणि माझं एवढंच सांगण्यात मोदींना स्वारस्य होतं. ९० मिनिटांच्या मुलाखतीत हजारवेळा मोदी फक्त स्वतःचंच महत्त्व विशद करत होते, त्यामुळेच या मुलाखतीत काहीही तथ्य नव्हतं असंही सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

तुमच्या ‘मी’पणामुळे देश अधोगतीकडे चालला आहे. २०१९ च्या पहिल्या दिवशीही तुम्ही तुमचंच महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्नशील असाल तर ही जनता वेडी नाही ती एकवटेल आणि तुम्हाला हटवेल असाही इशारा सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत दिला. तुमचे १०० दिवस उरलेत आणि उलटी गिनती सुरु झाली आहे हे विसरु नका असाही टोला सुरजेवाला यांनी लगावला. सत्तेवर येण्याआधी तुम्ही जी आश्वासनं दिली होती त्यापैकी कोणती तुम्ही पाळली? देशात नोटांबदीसारखा निर्णय घेऊन अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजवले. जीएसटीची अंमलबजावणीही धड केली नाहीत, आता तुम्हाला पुन्हा अपेक्षा आहे की जनता तुम्हाला पुन्हा निवडून देईल, मात्र या भ्रमात राहू नका असेही सुरजेवाला यांनी बजावले आहे.

Story img Loader