पंजाब नॅशनल बॅंकेच्या खातेधारकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. ज्या ग्राहकांनी आतापर्यंत त्यांचा KYC अपडेट केला नाही, अशा खातेधारकांना पुढील महिन्यापासून अडचणींचा सामना करावा लागणार आहे. १२ डिसेंबर नंतर ज्या खातेधारकांचा केवायसी प्रलंबित असेल, त्यांना बॅंक खात्यातून पैशांचे व्यवहार करण्यासाठी अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार, खातेधारकांनी १२ डिसेंबरपर्यंत केवायसी अपडेट करणं आवश्यक आहे, अशी सूचना पीएनबी बॅंकेकडून देण्यात आली आहे.
बॅंकेकडून खातेधारकांना महत्वाच्या सूचना
पीएनबी बॅंकेकडून खातेधारकांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या खातेधारकांचा KYC अपडेट करणं बाकी आहे, त्यांना त्यांच्या अधिकृत पत्त्यावर आणि मोबाईल नंबरवर SMS च्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच बॅंकेकडून २० आणि २१ नोव्हेंबर २०२२ ला त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरही नोटिफिकेशन शेअर करण्यात आलं आहे.
KYC अत्यंत गरजेचं
पीएनबी बॅंकेने ट्विट करत म्हटलं की, RBI च्या नियमावलीनुसार, सर्व खातेधारकांना केवायसी अपडेट करणं अनिवार्य आहे. तुमच्या खात्याचे केवायसी अपडेशन ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत अपेक्षित होतं, याबाबत तुम्हाला यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. तुम्ही बेस ब्रान्चला संपर्क करून तुमच्या खात्याचा केवायसी १२ डिसेंबर २०२२ पूर्वी अपडेट करा. तुम्ही केवायसी अपडेट न केल्यास तुमचं खातं बंद केलं जाऊ शकतं.
RBI ने दिला सल्ला
दिवसेंदिवस वाढत असलेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून सर्व बॅंकांना नियमितपणे केवायसी अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यापूर्वी दहा वर्षांमध्ये एकदा खातेधारकांना केवायसी अपडेट करण्याचा सल्ला बॅंकेकडून दिला जायचा. मात्र, आता तीन वर्षांच्या आत केवायसी अपडेट करण्यासाठी बॅंकेकडून सूचना दिल्या जातात.
आणखी वाचा – CCTV : साखळीचोराला पकडण्यासाठी पोलिसाने रचला सापळा; थरार सीसीटीव्हीत कैद
‘असं’ अपडेट करा केवायसी
खातेधारकांना केवायसी अपडेट करण्यासाठी अॅड्रेस प्रूफ, फोटो, पॅन, आधार नंबर आणि मोबाईल नंबर द्यावा लागतो. तुम्ही इमेल पाठवूनही केवायसी अपडेट करु शकता. तसंच बॅंकेत जाऊनही तुम्हाला केवायसी अपडेट करता येतं. कोणत्याही खातेधारकाचं केवायसी अपडेट करणं बाकी असेल, तर त्यांना बॅंकेकडून कोणत्याही प्रकारचा फोन कॉल केला जात नाही. त्यामुळे खातेधारक बॅंकेच्या कस्टमर केअर नंबरवर संपर्क करु शकतात.