पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५०० कोटींचा चुना लावून फरार झालेल्या मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण होणार की नाही याकडे सध्या सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान डोमिनिकामधील हायकोर्टात मेहुल चोक्सीने केलेल्या याचिकेवरील सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित झाली आहे. दरम्यान कोर्टाने यावेळी देशात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी मेहुल चोक्सीला तात्काळ दंडाधिकारी कोर्टासमोर हजर केलं जावं असा आदेश दिला आहे.

मेहुल चोक्सीच्या वकिलांनी अटक केल्याच्या ७२ तासांच्या आतच दंडाधिकारी कोर्टात हजर करण्याची गरज होती असा युक्तिवाद केला आहे. हायकोर्टाने हा युक्तिवाद मान्य करत मेहुल चोक्सीला गुरुवारी दुपारी ४ वाजता दंडाधिकार कोर्टासमोर हजर करण्यास सांगितलं आहे.

रक्ताळलेला डोळा… हातावर काळे व्रण; मेहुल चोक्सीचे कोठडीतील फोटो आले समोर

दरम्यान बुधवारी झालेल्या सुनावणीत, मेहुल चोक्सीच्या वकिलांनी त्याला डोमिनिका पोलिसांच्या कोठडीत सुरक्षित वाटत नसल्याचं म्हटलं आहे. अँटिग्वाला परत जाण्याचा खर्च करण्यास मी तयार असल्याचं मेहुल चोक्सीने कोर्टाला सांगितलं आहे. दरम्यान डोमिनिका सरकारने मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण करायचं असल्याची माहिती कोर्टात दिली आहे.

मेहुल चोक्सीचं अँटिग्वामधून अपहरण करुन छळ; शरीरावर मारहाणीच्या खुणा; वकिलांचा कोर्टात दावा

गेल्या आठवड्यात मेहुल चोक्सीला अटक झाल्यानंतर त्याच्या वकिलांनी कोर्टात धाव घेत हेबियस कॉर्पस याचिका दाखल केला होती. अँटिग्वालमधून डोमिनिकामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी मेहुल चोक्सीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. दरम्यान वकिलांनी मेहुल चोक्सीचं अपहरण करुन जबरदस्तीने डोमिनिकात नेण्यात आल्याचा दावा केला आहे. तसंच मेहुल चोक्सीचा छळ करण्यात आला असून त्याच्या शरीरावर जखमा असल्याचंही म्हटलं आहे.

मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५०० कोटींचा चुना लावल्यानंतर भारतातून फरार झाले होते. नीरव मोदी सध्या लंडनमधील जेलमध्ये असून भारतात प्रत्यार्पण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान मेहुल चोक्सीने जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळ काढण्याआधी २०१७ मध्ये अँटिग्वा आणि बारबुडा देशांचं नागरिकत्व घेतलं होतं.

 

Story img Loader