दक्षिण आफ्रिका हा देश तेथील वनजीवन आणि जंगली प्राण्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र याच प्राण्यांच्या बेकायदेशीर शिकारीसाठीही हा देश जगभरात कुप्रसिद्ध आहे. या देशामध्ये शिकारीविरोधात कठोर कायदे असूनही शिकारी छुप्या पद्धतीने गेंड्यांची, हत्तींची शिकार करतात. मात्र अशाच एका शिकाऱ्याला लपून शिकार करणे जिवावर बेतले. गेंड्याची शिकार करण्यासाठी गेलेल्या या शिकाऱ्याला हत्तीने पायाखाली चिरडले. मात्र त्यांनतरही सुरक्षारक्षकांना या शिकाऱ्याचा मृतदेह सापडला नाही. तपासानंतर या शिकाऱ्याचा मृतदेह सिंहाने खाल्ल्याची माहिती समोर आली आहे.

‘लॅबबायबल’ने दिलेल्या वृत्तानुसार पाच शिकारी क्रुगर राष्ट्रीय अभयारण्यामध्ये बेकायदेशररीत्या शिकार करण्यासाठी शिरले. मात्र त्यापैकी एका शिकाऱ्याला हत्तीने चिरडले. बाकी चौघांनी तेथून पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले. अभयारण्याच्या प्रदेशातून पळ काढताना या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या चौघांच्या चौकशीनंतर सगळा घटनाक्रम उघड झाला आहे. एका गेंड्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या या पाच जणांपैकी एकाला मागून आलेल्या जंगली हत्तीने पायाखाली चिरडले. त्यानंतर या चौघांनी शिकार करण्याचा विचार सोडून देत आपला जीव वाचवत तेथून पळ काढला. या घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी घटनास्थळाची पहाणी केली असता त्यांना तेथे मृतदेहाचे कोणतेही अवशेष सापडले नाही. मात्र काही दिवस सलग शोध घेतल्यानंतर अखेर क्रोकोडाइल ब्रिज परिसरामध्ये या मृत शिकाऱ्याच्या शरिराचे काही अवशेष आणि अंगावरील कपड्यांचे तुकडे सुरक्षारक्षकांना सापडले.

क्रुगर राष्ट्रीय अभयारण्या कार्यकारी अधिकारी ग्लेन फिलिप्स यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. ‘क्रुगर राष्ट्रीय अभयारण्यात बेकायदेशीररित्या तेही चालत प्रवेश करणे धोक्याचे आहे. घडलेली घटना ही या अभयारण्यातील वन्यजीवांपासून असलेला धोका दर्शवते. मेलेल्या शिकाऱ्याच्या मुलींना रडताना पाहून आम्हाला खूप त्रास झाला,’ असं फिलिप्स म्हणाले. मेलेल्या शिकाऱ्याचे शरिराचे छोटे अवशेष, एक बूट, रायफल आणि एक छोटी कुऱ्हाड इतक्याच गोष्टी अद्याप सापडल्या आहेत. ‘या शिकाऱ्यांकडे असलेला अन्नाचा साठा पाहिल्यास हे गेंड्यांच्या शिकाऱ्यासाठी काही दिवसांच्या मुक्कामाच्या विचाराने अभरायरण्यात शिरल्याचे समजते. त्यांना आमच्या अभरायण्यातील गेंड्याची शिकार करायची होती. मात्र येथील सिंह हेच सुरक्षारक्षक आहेत. आणि याच सिंहांनी या शिकाऱ्यांना पळवून लावले. एका व्यक्तीचा जीव गेल्याचे आम्हाला दु:ख आहे. पण हे शिकारी अनेक शस्त्रे घेऊन प्राण्यांची शिकार करायला येतात हे सत्यही नाकारता येणार नाही. मात्र अशा घटनांमुळे शिकाऱ्यांना एक संदेश जातो की नेहमी त्यांचाच विजय होत नाही. शिकारीच्या नादात त्यांना प्राणही गमावावा लागू शकतो,’ असं मत फिलिप्स यांनी व्यक्त केले.