सुप्रसिद्ध शायर मुनव्वर राणा आपल्या स्पष्ट आणि सडेतोड भूमिकांसाठी देखील ओळखले जातात. नुकतंच त्यांनी उत्तर प्रदेशमधील परिस्थितीवर केलेलं भाष्य विशेष चर्चेत आलं होतं. या पार्श्वभूमीवर मुनव्वर राणा यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर आपली भूमिका मांडली आहे. तालिबान्यांविषयी मुनव्वर राणा यांनी व्यक्त केलेल्या मतावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “तालिबान्यांनी गेली २० वर्ष अन्याय सहन केला आहे. त्यामुळे आता सत्ता आल्यावर त्यांना आनंद झाला आणि त्यांनी तो साजरा केला, तर त्याच आपल्याला त्रास व्हायला नको”, असं मुनव्वर राणा म्हणाले आहेत. एबीपीशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
“आनंद साजरा करणं साहजिक आहे”
काबूल हस्तगत केल्यानंतर तालिबान्यांनी तिथल्या शासकीय निवासस्थानांमध्ये, रस्तोरस्ती चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी तालिबान्यांनी गोळीबार केल्याच्याही घटना घडल्या आहेत. अफगाणिस्तान जिंकून घेतल्याचा आनंद तालिबानी रस्तोरस्ती आक्रमकपणे व्यक्त करत आहेत. यासंदर्भात मुनव्वर राणा यांनी वेगळं मत मांडलं आहे. “त्यांचा देश आहे. २० वर्षांपासून ते भटकत आहेत. अमेरिकेने त्यांच्यावर जो अन्याय केला, तो त्यांनी सहन केलाय. त्यांच्या कुटुंबातील लोक मेले आहेत. कोणतंच कुटुंब असं नसेल, ज्याचे दोन चार लोक मेले नसतील. त्यामुळे साहजिकच जेव्हा त्यांच्या हातात सत्ता येतेय, तर ते तो आनंद साजरा करणारच. आणि कुणाच्या आनंद साजरा करण्याविषयी आपल्याला त्रास व्हायला नको”, असं राणा म्हणाले आहेत.
तालिबानीही अफगाणिस्तानचेच आहेत…
दरम्यान, तालिबानी हे देखील अफगाणिस्तानचेच नागरिक असल्याचं मुनव्वर राणा यावेळी म्हणाले. “तालिबानी काही साता समुद्रापलीकडून आलेले नाहीत. ते अफगाणिस्तानचेच आहेत. आणि अफगाणिस्तानमधले लोक त्रस्त आहेत. त्यांच्यावर कधी रशिया राज्य करते, कधी अमेरिका राज्य करते, कधी फ्रान्स बॉम्बफेक करते. त्यामुळे त्या देशातल्या लोकांमधून भितीच मरून जाते”, असं मुनव्वर राणा म्हणाले आहेत.
कसं असेल अफगाणिस्तानातलं नवं सरकार? तालिबानी कमांडरनं सांगितला प्लान!
“आत्तापर्यंत अफगाणिस्तानातून असं काही ऐकू आलेलं नाही की अफगाणिस्तानी नागरिकांना मारलं जातंय. असेच लोक लपतायत, असेच लोक पळतायत, असेच लोक मारले जात आहेत, जे अफगाणी सत्तेच्या नशेत बुडाले होते. ज्याचं या सगळ्याशी काही देणं-घेणं नव्हतं, ते घाबरून पळत नाहीयेत”, असं देखील मुनव्वर राणा यांनी नमूद केलं आहे.