पीटीआय, नवी दिल्ली
कवी, लेखक आणि माजी आयपीएस अधिकारी केकी एन. दारूवाला यांचे दीर्घ आजाराने दिल्लीमध्ये गुरुवारी रात्री निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. भारताच्या सर्वोत्तम इंग्रजी लेखकांमध्ये दारूवाला यांची गणना होत असे. शब्दांवरील हुकमतीमुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त केली होती. खान मार्केटजवळील पारसी आरामगाह येथे शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.

केकी दारूवाला हे १९५८ मध्ये उत्तर प्रदेश तुकडीचे अधिकारी म्हणून भारतीय पोलीस सेवेत रुजू झाले. तत्कालीन पंतप्रधान चरण सिंह यांचे आंतरराष्ट्रीय विषयांवरील विशेष साहाय्यक होण्यापर्यंत त्यांनी प्रगती केली होती. त्यानंतर ते ‘रिचर्स अँड अॅनालिसिस विंग’ (रॉ) या संस्थेत दाखल झाले. तिथे त्यांना सचिवपदावर बढती मिळाली होती.

हेही वाचा >>>Election Commission : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचं महाराष्ट्राला पत्र; ‘या’ विषयावर व्यक्त केली नाराजी!

साहित्यिक म्हणून नावलौकिक दारूवाला साहित्यिक म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांचे पहिले पुस्तक ‘अंडर ओरियन’ १९७० मध्ये प्रसिद्ध झाले. दोन वर्षांनंतर त्यांच्या ‘अॅपरेशन इन एप्रिल’ या त्यांच्या दुसऱ्या पुस्तकासाठी त्यांना उत्तर प्रदेश सरकारचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर १९८४ मध्ये ‘द कीपर ऑफ द डेड’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. पुढे साहित्यिकांवर शारीरिक हल्ले करणाऱ्या वैचारिक समूहाविरोधात कोणतीही भूमिका न घेतल्याचा निषेध म्हणून २०१५ मध्ये त्यांनी हा पुरस्कार परत केला. त्यांना २०१४ मध्ये पद्माश्रीनेही सन्मानित करण्यात आले. त्यांचे अखेरचे पुस्तक ‘लँडफिल : पोएम्स’ हे गेल्या वर्षी प्रसिद्ध झाले.