पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वाढती रुग्णसंख्या असलेल्या ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी ऑक्सिजन, लसीकरण, औषधांचा काळाबाजार अशा बऱ्याच मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल पंतप्रधान म्हणाले…..
अनेक राज्यांतून ऑक्सिजनच्या पुरवठ्याबद्दल विचारणा करण्यात आली. याला उत्तर देताना पंतप्रधानांनी ऑक्सिजन पुरवठा वाढवण्याचे प्रयत्न चालू असल्याचं सांगितलं. त्याचसोबत सध्या औद्योगिक क्षेत्राकडचा ऑक्सिजन निकड भागवण्यासाठी वळवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व राज्यांनी परस्पर सहकार्यानं औषधं आणि ऑक्सिजनची गरज भागवावी असंही ते म्हणाले. त्याचबरोबर कोणत्याही राज्याने ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना कुठेही अडवू नये किंवा त्यांना वेठीस धरु नये असंही सांगितलं आहे.
राज्यातल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी राज्यांनी एक उच्चस्तरीय समितीची नेमणूक करावी असंही पंतप्रधानांनी सुचवलं आहे. ही समिती केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या ऑक्सिजनचं गरजेप्रमाणे रुग्णालयांमध्ये वाटप करेल.
ऑक्सिजन पुरवठ्याच्या संदर्भातला प्रवासातला वेळ कमी करण्याचे प्रयत्नही सुरु असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. रेल्वेकडून ऑक्सिजन एक्सप्रेस सुरु करण्यात आली असून ऑक्सिजन पुरवठ्यासाठी हवाई दलाचीही मदत घेणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
हेही वाचा – हवाई मार्गाने ऑक्सिजनची वाहतूक करण्याबाबत केंद्रानं महाराष्ट्राला दिली परवानगी, पण….
लसीकरणासंदर्भात पंतप्रधान म्हणतात…..
आत्ताच्या परिस्थितीत लसीकरणाचा वेग कमी व्हायला नको. सध्या भारच जगातली सर्वात मोठी लसीकऱण मोहीम राबवत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं. तसंच भारत सरकारने १५ कोटींहून अधिक लसी राज्यांना मोफत दिल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर राज्यांना लसीकरण मोहिमेवर अधिक भर देण्यास सांगितलं आहे.
रुग्णालयांच्या सुरक्षेबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले….
रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षेबद्दलची सर्व खबरदारी घ्यायला हवी असं पंतप्रधान म्हणाले. त्यांनी देशातल्या ऑक्सिजन गळती दुर्घटना आणि रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं.
केंद्र सरकारचा राज्यांना या लढाईत पूर्ण पाठिंबा असेल असं मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच आरोग्य मंत्रालय सर्व राज्यातल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी सांगितलं.