Flood in Muzaffarabad Pakistan accuses India : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारताने पाकिस्तानला दोन्ही देशांमधून वाहणाऱ्या नद्यांचं पाणी रोखण्याचा इशारा दिला आहे. अशातच पाकिस्तानमधील नद्यांना पूर आला आहे. पाकिस्तानच्या मुजफ्फराबादमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

मुजफ्फराबाद व आसपासच्या भागातील पाण्याचा स्तर वाढला. नद्यांमधील पाण्याची पातळी वाढून पूर आला आहे. स्थानिक प्रशासनाने हट्टियन बालामध्ये ‘जल आणीबाणी’ जाहीर केली आहे. मशिदींमधून लोकांना सूचना दिल्या जात आहेत. उत्तर काश्मीरमधील बारामुल्लाह जिल्ह्यातून पाणी पाकव्याप्त काश्मीर आणि पाठोपाठ मुजफ्फराबादमध्ये शिरलं. परिणामी उत्तर पाकिस्तानात पूर आला आहे. भारताने सिंधू जलकरार स्थगित करण्याचा इशारा दिल्यानंतर ही घटना घडली आहे.

सिंधू नदीतील पाण्याशी संबंधित उभय देशांमधील माहितीचं आदान-प्रदान, आयुक्तांच्या बैठका रद्द

भारत सरकारने शनिवारी सिंदू जलकरार स्थगित करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी औपचारिक अधिसूचना जारी केली आहे आणि गुरुवारी ही अधिसूचना पाकिस्तानला सोपवली. या अधिसूचनेत म्हटलं आहे की “आम्ही सिंधू जलकरार स्थगित करत आहोत.” त्यामुळे सिंधू नदीतील पाण्याशी संबंधित वेगवेगळ्या विभागांच्या आयुक्तांमधील बैठका, उभय देशांमधील माहितीचं आदान-प्रदान व नवीन प्रकल्पांची आगाऊ सूचना यासह करारातील इतर जबाबदाऱ्या निलंबित करण्यात आल्या आहेत. हा करार स्थगित केल्यामुळे भारत आता पाकिस्तानच्या परवानगीशिवाय किंवा त्यांच्याशी सल्लामसलत न करता नदीवर धरणे बांधण्यास मोकळा आहे.

भारताने पाठवलेल्या पत्रात काय म्हटलंय?

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना भारताने एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात भारताचे जलसंपदा सचिव देबश्री मुखर्जी यांनी म्हटलं आहे की जम्मू व काश्मीरला लक्ष्य करत पाकिस्ताकडून सातत्याने सीमा ओलांडून दहशतवादी कारवाया चालू आहेत. यामुळे सिंधू जलकरारांतर्गत भारताच्या अधिकारांवर गदा येत आहे.