पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू काश्मीरचा भाग आहे म्हणूनच पाकव्याप्त काश्मीर हे भारताचेच आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले आहे. शुक्रवारी काश्मीरप्रश्नी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली त्यावेळी मोदी बोलत होते. यापुढे देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीच तडजोड केली जाणार नाही असेही ते म्हणाले. तसेच मनात असंतोष खदखदत असलेल्या काश्मीरी नागरिकांचा विश्वास आपल्याला जिंकायला पाहिजे असे आवाहनही त्यांनी बैठकित बोलताना केले. गेल्या महिन्याभरापासून जम्मू काश्मीरमध्ये जे असंतोषाचे वातावरण आहे त्याबद्दल मला दु:ख आहे आणि येथील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार शक्य ते प्रयत्न करेल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
काश्मीर प्रश्नाविषयी सगळ्याच पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवला याबद्दल त्यांनी सगळ्यांचे आभार मानले. पाकिस्तानच या अशांततेच मूळ कारण आहे असे म्हणत मोदी यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवरही टीका केली. काश्मीरमधल्या प्रश्नावर लवकरच मार्ग काढला जाईल आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वाणी मारला गेल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचाराचे वातावरण आहे. नागरिकांकडून अनेक ठिकाणी हल्ले केले जात आहेत. गेल्या महिनाभरापासून काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जमावाचे हल्ले थोपवण्यासाठी अतिरिक्त सेनाही काश्मीर खो-यात तैनात करण्यात आली आहे. या हिंसाचारात गेल्या महिनाभरापासून ४ हजारांहून अधिक सैनिक तर साडेतीन हजारांहून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिली. त्यामुळे काश्मीरच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा