संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा रेटणा-या पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेने घरचा आहेर दिला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली येथील नागरिकांनी पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय या गुप्तचर यंत्रणेने केलेल्या अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केले आहे. बनावट चकमक आणि स्वातंत्र्याची मागणी करणा-या नेत्यांवरील अमानूष कारवाईच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील ऑल पार्टी नॅशनल अलायन्स आणि जम्मू काश्मीर नॅशनल लिबरेशन कॉन्फरन्स या संघटनेचे अध्यक्ष आरिफ शाहिद यांची २०१३ मध्ये हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या तपास अजूनही संथगतीने सुरु असून शाहिद यांच्या आयएसआयचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचा स्वतंत्र तपास करण्याची स्थानिकांची मागणी आहे. पाकिस्तानी सैन्याने आत्तापर्यंत केलेल्या अत्याचारांविरोधात नागरिकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ‘काश्मिरींचे कसाई, पाकिस्तानी सैन्य’, ‘आयएसआयपेक्षा कुत्रे जास्त प्रामाणिक’ अशा संतप्त घोषणा देत रविवारी स्थानिक रस्त्यावर उतरले.
मुझफ्फराबादमधील सर्व पक्षीय आघाडीने दिलेल्या माहिती नुसार पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी लढा देणा-या १०० हून अधिक कार्यकर्त्यांची आयएसआयने हत्या केली आहे. यामुळे स्थानिकांमध्ये पाकिस्तानी सैन्याविरोधात असंतोष खदखदत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पाकिस्तानी मुस्लीम लीग हा पक्ष पाकव्याप्त काश्मीरमध्ये सत्तेवर येत असताना स्थानिकांनी आंदोलन केले होते. अमेरिकेनेही पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे सांगत पाकिस्तानला शांततेने वादावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील १५ ऑगस्टच्या भाषणात पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानमधील पाक सैन्याच्या अत्याचाराचा मुद्दा मांडून पाकिस्तानवर निशाणा साधला होता. आता पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरमधील जनता रस्त्यावर उतरल्याने पाकिस्तानच्या अडचणीत भर पडली आहे.
Kotli residents in Pakistan-occupied Kashmir (PoK) took to the streets to protest against atrocities committed by Pak Army and ISI. (Recent) pic.twitter.com/CTcR8kEcdy
— ANI (@ANI) October 2, 2016
#WATCH: Kotli residents in PoK took to the streets to protest against atrocities committed by the Pakistan Army and the ISI. (Recent) pic.twitter.com/jxbnynWrsc
— ANI (@ANI) October 2, 2016