दिल्लीतील न्यायालयात झालेल्या बॉम्बस्फोटाचं रहस्य उलगडलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी डीआरडीओच्या वैज्ञानिकाला अटक केली आहे. त्यानेच न्यायालयात टिफीन बॉम्ब ठेवला होता. सुरुवातील या बॉम्बस्फोटामागे दहशतवाद्यांचा तर हात नाही ना अशी शंका व्यक्त केली गेली. पोलिसांनी त्या दृष्टीकोनातूनही तपास केला. मात्र, तपासात या वैज्ञानिकाने आपल्या जुन्या भांडणाचा वचपा काढत शेजाऱ्याला मारण्यासाठी हा कट रचल्याचं समोर आलंय. हे ऐकून दिल्ली पोलीसही अवाक झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपीचं नाव भारत भुषण कटारिया असं आहे. त्याच्याविरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळाले आहेत. बॉम्बस्फोटाच्या वेळी हा आरोपी वैज्ञानिक देखील न्यायालयाच्या आवारातच होता. त्यामुळे आता पोलीस या कटात आणखी कुणाचा सहभाग आहे याचा तपास करत आहेत. तसेच या स्फोटामागील दहशतवाद्यांच्या सहभागाची शक्यता त्यामुळे संपली आहे.

“सीसीटीव्ही तपासल्यानंतर एक संशयित आढळला”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयात झालेला स्फोट हा कमी तीव्रतेचा होता. या स्फोटानंतर पोलिसांनी या न्यायालयात सुनावणीला असलेल्या सर्व प्रकरणांचा तपास केला. त्यावेळी त्यांना एक पुरावा हाती लागला. याशिवाय सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यातही एक संशयित आढळला. त्याच्याबाबत कोर्टात हजर असणाऱ्यांकडे चौकशी केली असता एकाने तो आपला शेजारी असल्याचं सांगितलं. यानंतर आरोपी वैज्ञानिकाला अटक करण्यात आली.

“वैज्ञानिक आणि शेजारच्यामध्ये संपत्तीवरून वाद”

आरोपी कटारिया आणि त्याच्या शेजारच्यामध्ये संपत्तीवरून वाद सुरू होते. त्या प्रकरणात शेजाऱ्याने कटारियाला न्यायालयात खेचलं होतं. सुनावणीला अनावश्यक दिरंगाई केल्याप्रकरणी कोर्टाने आरोपी कटारियाला १ हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता. याचाच राग मनात धरून आरोपी कटारियाने हत्येचा कट रचला. यासाठी त्याने टिफीन बॉक्सचा वापर केला. मात्र, त्या बॉम्बची जोडणी व्यवस्थित झालेली नसल्याने या बॉम्बचा डेटोनेटर बंद होऊन अर्ध्या स्फोटकांचा स्फोट झाला नाही. यामुळे मोठा अनर्थ टळला, अशी माहिती पोलिसांकडून कळाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrest drdo scientist in delhi court blast case know the seasons pbs