जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भारतविरोधी घोषणा देणारे ‘अभाविप’चे कार्यकर्ते होते, हे दाखविणारी कथित ध्वनिचित्रफीत सामाजिक संकेतस्थळांवर प्रदर्शित करण्यात आली आहे. परंतु संघटनेच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्यासाठी ही बनावट ध्वनिचित्रफीत तयार करण्यात आल्याचा दावा ‘अभाविप’ने केला आहे.
सामाजिक संकेतस्थळांवर ‘द कॉन्स्पिरसी’ या शीर्षकाखाली प्रदर्शित करण्यात आलेली ही ध्वनिचित्रफीत १ मिनिट ३२ सेकंदांची आहे. त्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणारे हे ‘अभाविप’चे कथित कार्यकर्ते असल्याचे दाखविण्यात आले आहे. संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या अफजल गुरूच्या स्मृतीनिमित्त विद्यापीठात डाव्या संघटनांकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘अभाविप’च्या सदस्यांनी या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा केल्या. या कार्यक्रमात वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांचे, तसेच बाहेरचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्यानंतर मग इतर विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुकरण केले. कार्यक्रमात शांततापूर्ण चर्चा सुरू असताना त्यांनी घोषणाबाजी केली. कोण काय म्हणाले, याबद्दल आम्हाला कल्पनाही नाही. तरीही प्रत्येक विद्यार्थ्यांची देशविरोधी म्हणून संभावना करण्यात येत आहे, असे डाव्या विचारांच्या ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’च्या वतीने सांगण्यात आले.
जेएनयू विद्यार्थी संघटनेचा सहसचिव व ‘अभाविप’चा पदाधिकारी सौरभकुमार शर्मा याने हे आरोप फेटाळून लावले. तो म्हणाला की, आम्ही देशविरोधी कारवायांना विरोध केला. त्यामुळे आमचे प्रतिमाभंजन करण्याचा खटाटोप सुरू आहे. खोटी माहिती पसरविण्यासाठी व बदनामी करण्याकरिता ही बनावट ध्वनिचित्रफीत बनविण्यात आली आहे, असा दावा शर्मा याने केला.

Story img Loader