अहमदाबादमध्ये व्हॅलेंटाईन डेला पत्नीची हत्या करुन फरार झालेल्या 42 वर्षीय आरोपी पतीला पोलिसांनी तब्बल 15 वर्षांनी अटक केली आहे. तरुण जिनराज असं आरोपी पतीचं नाव आहे. गळा दाबून त्याने पत्नीची हत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने हत्येनंतर पळ काढला होता. त्याने आपली ओळख बदलत पुन्हा लग्न केलं होतं. गेल्या सहा वर्षांपासून तो बंगळुरुत आपली पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होता.
अहमदाबाद गुन्हे शाखेने या हत्येचा छडा लावला असून आरोपी तरुणला अहमदाबादहून बंगळुरुला आणण्यात आलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 फेब्रुवारी 2003 रोजी आरोपी तरुणने पत्नी सजनीची गळा दाबून हत्या केली. त्यांच्या लग्नाला फक्त तीनच महिने पूर्ण झाले होते. त्याने चोरांनी हत्या केल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. लग्नाआधी असणाऱ्या आपल्या प्रेसयीसोबत लग्न करण्यासाठी त्याने ही हत्या केली होती. तरुण त्यावेळी एका शाळेत बास्केटबॉल प्रशिक्षक म्हणून काम करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आरोपी तरुणला संशय आपल्याकडे वळत असल्याचं लक्षात आलं तेव्हाच त्याने पत्नी सजनीच्या खात्यातून 11 हजार रुपये काढून घेत पळ काढला. पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्ता लागला नाही. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांकडेही चौकशी करत माग काढण्याचा प्रयत्न केला होता.
गुन्हे शाखेचे अधिकारी काही दिवसांपूर्वी तरुणची आई अन्नामा यांच्या मध्य प्रदेशातील घरी गेले होते. यावेळी त्यांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली केली. ‘शेजाऱ्यांनी त्यांना दोन मुलं असून एक दक्षिणेत आणि दुसरा अहमदाबादमध्ये राहत असल्याचं सांगितलं. यावेळी आम्हाला त्या वारंवार केरळ आणि बंगळुरुला जात असल्याचं कळलं. तपास केला असता केरळमध्ये त्या धार्मिक ठिकाणी दर्शनासाठी जात होत्या असं समजलं’, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
अन्नामाला बंगळुरुमधील एका लँडलाइन नंबरवरुन फोन येत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. हा नंबर ओरॅकलवर रजिस्टर होता. तर मोबाइल क्रमांक आरोपी तरुणची सध्याची पत्नी निशाच्या नावे रजिस्टर होता.
पोलिसांनी लगेचच बंगळुरुमधील पत्ता मिळवला. ‘लँडलाइन नंबर असल्याने आम्हाला थोडं आश्चर्य वाटत होतं. आम्ही आरोपी तरुणाचा त्याच्याशी काही संबंध आहे का तपासलं असता हाती काही लागलं नाही’, असं अधिकाऱ्याने सांगितलं.
यावेळी पोलिसांना निशाचं प्रवणी बटालिया नावाच्या व्यक्तीशी लग्न झालं असल्याचं कळलं. पण फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर निशाच्या फोटोत फक्त मुलं दिसत होती. त्यात कुठेही प्रवीण नव्हता. पोलिसांनी पुन्हा एकदा ओरॅकरलशी संपर्क साधत प्रवीण कुठे काम करतो आणि ऑफिसमध्ये पोहोचला आहे का याची माहिती मिळवली. ‘सुरुवातीला त्याने नकार दिला. मात्र नंतर त्याने गुन्हा कबूल केला. त्याने नंतर पत्नीला फोन करुन आपली खऱी ओळख सांगितली’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अहमदाबादमधून पळून गेल्यानंतर तरुणने आपली ओळख बदलली होती. त्याने कॉलेजमधील ज्युनिअर प्रवीण बटालिया ही ओळख सर्वांना सांगितली. त्याने खोटी कागदपत्रंही तयार केली आणि कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळवली. ‘बंगळुरुला जाण्याआधी तो पुण्यात राहत होता. तिथेच त्याची निशासोबत भेट झाली आणि लग्न केलं. त्याने निशाला आपल्या आई वडिलांचा अपघातात मृत्यू झाला असून एकटेच वाढलो अशी खोटी माहिती दिली होती. जेव्हा त्याचे आई वडिल घरी घ्यायचे तेव्हा तो आपले काका, काकी असल्याची खोटी ओळख सांगायचा’, असं पोलिसांनी सांगितलं आहे.