जेव्हा कायदा सुव्यवस्था पाळणारेच कायदा हातात घेतात, गुंडांची भाषा आणि कृती करतात तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते. अशीच परिस्थिती बिहारमध्ये पाहायला मिळाली. बिहारमधील झंझारपूरमध्ये बिहार पोलिसांनी न्यायाधीशांना त्यांच्या चेंबरमध्ये घुसून मारहाण केली. तसेच बंदूक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित न्यायधीशांनी एका तक्रारीच्या सुनावणी प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना हजर राहण्यास सांगितलं. यावर चिडून या पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट न्यायाधीश अविनाश कुमार यांच्यावरच हल्ला केला. या प्रकरणाचे पडसाद पाहून पाटणा उच्च न्यायालयाने स्वतः दखल घेत रिट याचिका दाखल करून घेतलीय. तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकांना हजर राहण्याचे आदेश दिलेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय झालं?

पूर्व घोघरडीहामधील भोलीरही गावातील उषा देवी नावाच्या महिलेने पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना खोट्या प्रकरणात फसवून गुन्हे दाखल केल्याची आणि शोषण होत असल्याची तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत न्यायाधीश अविनाश कुमार यांनी आरोपी पोलीस अधिकाऱ्याला न्यायालयात हजर होण्यास आणि त्याची बाजू मांडण्यास सांगितलं. मात्र, आरोपी पोलीस अधिकारी दिलेल्या वेळेत आले नाही. सकाळी ११ वाजताची वेळ असताना ते दुपारी २ वाजता आले आणि थेट न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये गेले. तेथे त्यांनी मोठ्या आवाजात बोलण्यास सुरुवात केली.

आमच्या साहेबांना हजर राहायला सांगता काय, तुम्हाला या जगातूनच निरोप देतो असं म्हणत त्यांनी न्यायाधीशांना मारहाण केली. तसेच पिस्तुल काढून न्यायाधीशांच्या अंगावर रोखला. दरम्यान, न्यायाधीशांच्या चेंबरमधील आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे न्यायालयीन कर्मचारी आणि वकील घटनास्थळावर हजर झाले. त्यांनी आरोपी पोलिसांना तात्काळ धरलं आणि एका खोलीत बंद केलं.

पाटणा उच्च न्यायालयाकडून सुमोटो

पाटणा उच्च न्यायालयाने या प्रकाराची स्वतः दखल घेत रिट याचिका दाखल केलीय. तसेच हा हल्ला म्हणजे न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचं म्हटलंय. या प्रकरणी न्यायालयाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना २९ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश दिलेत. याशिवाय मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना या प्रकरणात १ आठवड्यात तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत.

“अशी शिक्षा द्या की परत कोणी हिंमत करू नये”, बार काऊंसिलची मागणी

बार काऊंसिलने या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केलीय. ही शिक्षा अशी असावी की परत कुणाचीही हल्ला करण्याची हिंमत होऊ नये, असं बार काऊंसिलने म्हटलंय.

१९९७ मध्येही अशाच प्रकारे न्यायाधीशांवर हल्ला

दरम्यान, बिहारमधील हे पहिलंच प्रकरण नाही. याआधी १९९७ मध्ये आजच्याच दिवशी म्हणजेच १८ नोव्हेंबरला अशाच प्रकारे न्यायाधीशांवर हल्ला झाला होता. पोलिसांनी चेंबरमध्ये घुसून न्यायाधीशांना मारहाण केली होती. याशिवाय मोठ्या प्रमाणात वकिलांना देखील मारहाण झाली होती. भागलपूरमध्ये न्यायाधीशांना मारहाणीचा प्रकार घडला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police beat judge for summons officers after a women complaint of fraud case in bihar pbs