बिहारमधील कटिहार जिल्ह्याच्या बारसोई येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे वीज पुरवठा विभागाविरोधात आंदोलन करणाऱ्या जमावावर पोलिसांनी गोळीबार केला. या दुर्दैवी घटनेत एकाचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. वीज विभागाविरोधात निदर्शने करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
‘एएनआय’नं दिलेल्या वृत्तानुसार, कटिहार जिल्ह्याच्या बारसोई शहराजवळील एका खेड्यात स्थानिक रहिवाशांनी वीज विभागाविरोधात आंदोलन केलं. विजेचा अनियमित पुरवठा आणि वाढीव दराविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जमावाने दगडफेक करत विद्युत विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली.
हेही वाचा- मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा भडका; जमावाने सुरक्षा दलाच्या दोन बसेस पेटवल्या
यावेळी घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरुवातीला हवेत गोळीबार केला. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि गोळीबार केला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. तर दोनजण जखमी झाले. यावेळी घटनास्थळी जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते.
पोलिसांच्या गोळीबारात मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव मोहम्मद खुर्शीद (वय-३५) असं आहे. जखमींपैकी एकाला पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर दुसऱ्यावर कटिहार येथील सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जमावाने केलेल्या हल्ल्यात वीज विभागाचे १२ कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.