शहरी भागांत बेशिस्त वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यावर तोडगा म्हणून एक अजब योजना अहमदाबाद प्रशासनाने सुरू केली आहे. अहमदाबाद येथे वाहतुकीचे नियम पाळणाऱया चालकांना एक लिटर पेट्रोल चक्क मोफत मिळणार आहे. विशेष म्हणजे ही योजना वाहतुक पोलिसांनीच आखली आहे.
अहमदाबादमधील रामोल भागात गुरूवारी एकूण ५८ चालकांनी वाहतुकीचे नियम पाळताना आढळून आले. त्यांना बक्षिस म्हणून प्रत्येकी एक लिटर पेट्रोल मोफत देण्यात आल्याचे स्थानिक पोलिस अधिकाऱयाने सांगितले. यात चालकाकडील सर्व आवश्यक कागदपत्रे तपासली गेली. तसेच दुचाकीस्वारांनी घातलेले हेल्मेट आणि चारचाकी चालवताना सीटबेल्ट लावलेल्यांना हे बक्षीस देण्यात आले.
वाहतुकीचे नियम पाळण्यास नागरिकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ही योजना सुरू केली असून त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. ही मोहिम आणखी तीन दिवस सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत राबविली जाणार आहे.

Story img Loader