पाच वर्षे सुरक्षा यंत्रणांच्या हातावर तुरी देणारा यासिन भटकळ खरे तर चार वर्षांपूर्वीच एका प्रकरणात अनायासे पोलिसांच्या हाती सापडला होता. मात्र, आपली वेगळी ओळख पटवून तुरुंगाबाहेर पडण्यात तो यशस्वी ठरला.
कोलकात्यातील करिश्माधवन सेठ या व्यक्तीने केलेल्या तक्रारीनंतर एका चोरीच्या प्रकरणात कोलकाता पोलिसांनी यासिन भटकळला अटक केली होती. मात्र, अटकेनंतर काही दिवसांनीच, २९ डिसेंबर २००९ रोजी तो बाहेर पडला. यासिनला कोलकात्यातील शेक्सपीअर सरनी ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली होती. मात्र, आपण कोलकात्यातील ‘नं. ९, नॉर्थ रेंज’ येथे राहणाऱ्या कार्तिक मलिक याचा मुलगा बुल्ला मलिक आहोत, असे खोटे नाव त्याने सांगितले. त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या अन्य दोघांनीही आपली नावे मोहम्मद नौशाद आणि मोहम्मद जहांगीर असल्याचे पोलीस चौकशीत सांगितले. त्यानंतर ‘अटकेतून काही निष्पन्न झाले नाही’ असा शेरा मारत या तिघांनाही सोडून देण्यात आले.
कोलकाता पोलिसांच्या या दुर्लक्षाचा उलगडा बंगळूरूतील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर २०१०साली झालेल्या स्फोटाच्या तपासादरम्यान झाला. स्फोटातील आरोपीनींच याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, आपण यासिन भटकळ नावाच्या कोणत्याही व्यक्तीला अटक केली नाही, असा खुलासा कोलकाता पोलिसांनी केला. परंतु, त्याचे छायाचित्र त्यांनी ओळखले. हे छायाचित्र यासिनने पासपोर्ट काढण्यासाठी रांची पासपोर्ट कार्यालयात सादर केले होते. २० जानेवारी २०१० रोजी ‘अंजर हुसेन’ या नावाने त्याने हा अर्ज केला होता. त्यावेळी यासिनसोबत अर्ज करणारा मोहम्मद कातिल सिद्दीकी याला बंगळूरू स्फोटांप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर ही माहिती उघड झाली.
सिद्दीकीने पोलीस चौकशीदरम्यान यासिनच्या कोलकाता अटकेबद्दलचा तपशील दिला. बनावट चलनाची तस्करी करणाऱ्या व्यक्तीला भेटायला गेलो असताना आपल्याला अटक करण्यात आली, असे यासिनने त्यावेळी सिद्दीकीला सांगितले होते. मात्र, आपण पोलिसांना गुंगारा देऊन कसे सुटलो व बिहारमधील दरभंगा येथील घरी कसे परतलो, असेही यासिनने सिद्दीकीला सांगितले होते.
हाती आला नि निसटला..
पाच वर्षे सुरक्षा यंत्रणांच्या हातावर तुरी देणारा यासिन भटकळ खरे तर चार वर्षांपूर्वीच एका प्रकरणात अनायासे पोलिसांच्या हाती सापडला होता.
First published on: 30-08-2013 at 05:18 IST
TOPICSयासिन भटकळ
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police had missed the chance to arrest yasin bhatkal before