पटेल समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याला गुजरात पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांचा नेता हार्दिक पटेल याने बुधवारी केला. त्याचबरोबर पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धारही त्याने व्यक्त केला.
तो म्हणाला, अहमदाबादमधील मैदानावर अत्यंत शांतपणे हे आंदोलन सुरू होते. पण केवळ राजकीय नेत्यांच्या इच्छेसाठी पोलीसांनी आंदोलनामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आंदोलनकर्ते चिडले. पोलीसांनीच हिंसाचार करण्याला सुरुवात केली. त्यांनी सर्वसामान्य माता, भगिनी आणि लहान मुलांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तेथील आंदोलन चिरडण्यात आले. त्याच पद्धतीने इथेही आंदोलन चिरडण्याचा पोलीसांचा डाव आहे.
मी माझ्या भाषणात काहीही प्रक्षोभक बोललो नव्हतो, असे सांगून तो म्हणाला, अहिंसेच्या मार्गानेच आम्ही आमचा लढा सुरू ठेवू. लोकांना शांत राहण्याचे आवाहन आम्ही करतो आहोत. जर गरज पडल्यास गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक उपोषण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader