Himani Narwal Murder Case Update: हरियाणामधील काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांचा मृतदेह रोहतक येथे एका सुटकेसमध्ये आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी आज सकाळी आरोपी सचिनला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. हिमानीचा खून कसा झाला? कोणत्या कारणामुळे झाला? याची सविस्तर माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत विशद केली. आरोपी सचिन आधीच विवाहित असून झज्जर जिल्ह्यात त्याचे मोबाइलचे दुकान होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेसबुकपासून सुरू झाली मैत्री

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि हिमानी यांची फेसबुकवर ओळख झाली होती. सचिन हिमानीला भेटण्यासाठी अधूनमधून तिच्या घरी येत होता. २७ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता सचिन हिमानीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. रात्री तो तिच्याच घरी थांबला. दुसऱ्या दिवशी (२८ फेब्रुवारी) दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की, सचिनने हिमानीला तिच्याच ओढणीने बांधले आणि त्यानंतर मोबाइल चार्जरने गळा दाबून तिचा खून केला. दोघांच्या झटापटीत सचिनच्या हातालाही दुखापत झाली. त्याच्या रक्ताचे डाग हिमानीच्या घरात आढळून आले आहेत.

हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

हत्या झाल्यानंतर सचिनने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. ज्या चादरीवर सचिनचे रक्त सांडले होते. त्या चादरीतच हिमानीचा मृतदेह गुंडाळून सुटकेसमध्ये भरण्यात आला. त्याने हिमानीची अंगठी, सोन्याची चैन, मोबाइल, लॅपटॉप, इतर दागिने एका बॅगेत भरले आणि तिची दुचाकी घेऊन तो स्वतःच्या गावी बहादुरगड येथे निघून गेला. रात्री १० वाजता तो पुन्हा हिमानीच्या घरी परतला. तिची दुचाकी घराबाहेर उभी केली आणि एक रिक्षा भाड्याने घेऊन त्यात मृतदेहाची बॅग टाकली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रोहतकच्या सांपला येथे निर्जन स्थळी बॅग फेकून दिली.

पोलिसांची कारवाई

१ मार्च रोजी सांपला बस स्टँड येथे पोलिसांना मृतदेह असलेली बॅग आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ विशेष तपास पथक नेमून चौकशी सुरू केली. सचिनला दिल्लीतून अटक करण्यात आली. त्याच्याकडून हिमानीच्या सर्व वस्तू हस्तगत करण्यात आल्या. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपी सचिनच्या हातावर ओरखडण्याच्या आणि चावा घेतल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत.

सचिनच्या अटकेनंतर हिमानीच्या भावाने आरोपीला फाशी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. हिमानीचा भाऊ जतीनने म्हटले की, आरोपीला अटक झाल्यानंतर आज आम्ही हिमानीवर अंत्यसंस्कार करत आहोत. माध्यमात बऱ्याच वावड्या उठल्या आहेत. त्यामुळे आमची सर्वांना विनंती आहे की, कृपया चुकीची माहिती पसरवू नका. आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. आरोपीला फाशी व्हावी, अशी आमची मागणी आहे.