नोएडा पोलिसांनी बाग तसंच सार्वजनिक ठिकाणं धार्मिक कार्यक्रमांसाठी वापरलं जाऊ शकत नाही असं जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर सेक्टर 58 मध्ये असणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक बागेत शुक्रवारी नमाज पठण करु नये अशी सूचना करण्यात आली आहे. पोलिसांनी कंपन्यांसाठी नोटीस जारी केली असून कर्मचाऱ्यांनी या नियमाचं उल्लंघन केल्यास कंपन्याना जबाददार ठरवण्यात येणार आहे.
नोटीस जारी झाल्यानंतर कंपन्यांनी यासंबंधी स्पष्ट चित्र निर्माण व्हावं यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. कंपन्यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. नोटीस जारी होताच औद्योगिक केंद्र असणाऱ्या नोएडामध्ये तणाव निर्माण झाला. यानंतर पोलिसांनी लगेचच स्पष्टीकरण देत हा निर्णय कोणत्याही धर्माविरोधात नसल्याचं म्हटलं आहे.
एनडीटीव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, काही हिंदू संघटनांनी पोलिसांकडे उघड्यावर नमाज पठण केल्याने परिसरातील एकोपा बिघडत असल्याची तक्रार केली होती. यानंतर 58 पोलीस स्थानकांना कंपन्यांना नोटीस पाठवण्यास सांगण्यात आलं. पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये कोणालाही शुक्रवारी नमाज पठण करण्याकरिता पार्कात प्रवेश दिला जाणार नाही असं स्पष्ट लिहिलं आहे.
‘तुमचे मुस्लिम कर्मचारी नमाज पठण करण्यासाठी सेक्टर 58 मधील पार्कात जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. कृपया त्यांनी अस करु नये अशी सूचना द्या. यनंतरही जर ते पार्कात गेले तर नियमांचं उल्लंघन केल्यासाठी कंपनी जबाबदार असेल’, असं नोटीसमध्ये लिहिलं आहे. नोएडाचे एसएसपी अजय पाल यांनी ही ऑर्डर कोणत्याही एका ठराविक धर्माला टार्गेट करण्यासाठी नसल्याचं सांगितलं आहे.
‘काहीजणांना सेक्टर 58 मधील पार्कात प्रार्थना करण्यासाठी परवानगी मागितली होती, पण दंडाधिकाऱ्यांनीच ती परवानगी नाकारली आहे. मात्र अद्यापही तिथे लोक जमा होतात. या नोटीशीतून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाला परवानगी मिळणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे’, असं पाल यांनी सांगितलं.
पोलिसांनी नोटीस दिल्यानंतरही तिथे जाऊन नमाज पठण करणाऱ्या मौलाना नौमान आणि त्यांच्या मित्राला अटक करण्यात आली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. आपण गेल्या पाच वर्षांपासून तिथे नमाज पठण करत असून यामुळे शांतता भंग पावत असल्याचं पोलिसांनी सांगितल्यांचं मौलाना नौमान यांनी सांगितलं आहे.