पुढील २-३ दिवस भेटण्यासाठी आपल्याला वेळ नाही, असे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केल्यानंतर आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी आपल्या गाड्यांचा ताफा गांधीनगर रस्त्यावरून विमानतळाकडे वळवला. शुक्रवारी सकाळी सुमारे दीड ते दोन तास अहमदाबाद-गांधीनगर रस्त्यावर नाट्यमय घडामोडी घडल्या.
केजरीवाल यांच्या गाड्यांचा ताफा शुक्रवारी सकाळी गांधीनगर अलीकडे पोलीसांनी अडविला. मोदी यांना काही प्रश्न विचारायचे असल्यामुळे आपण त्यांना भेटायला निघालो आहोत, असे केजरीवाल यांनी पत्रकारांना सांगितले होते. केजरीवाल यांनी मोदी यांच्या भेटीसाठी वेळ घेतलेली नव्हती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या गाड्यांचा ताफा गांधीनगर अलीकडेच पोलीसांनी अडविला. यावेळी पोलीसांनी केजरीवाल यांच्याकडे चौकशीही केली. चौकशीनंतर केजरीवाल यांच्या गाड्यांचा ताफा पोलीसांनी रस्त्याच्या बाजूला घेतला. मोदींच्या भेटीसाठी वेळ घेतली नसल्यामुळे आपल्या गाड्यांचा ताफा अडविण्यात आला, असे केजरीवाल यांनी पत्रकारांना सांगितले. ‘आप’चे नेते मनिष सिसोदिया यांनी मोदी यांची वेळ घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. मात्र, पुढील २-३ दिवस मोदी यांच्याकडे वेळ नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. दरम्यान, काही भाजप समर्थकांनी केजरीवाल यांच्या गाडीजवळ येऊन घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफा अहमदाबाद विमानतळाकडे रवाना झाला.

Story img Loader