जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह भातशेतात आढळून आला आहे. ही हत्या दहशतवाद्यांनी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. फारूख अहमद मीर असे मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. फारूख यांचे अपहरण करून निर्जनस्थळी नेऊन गोळ्या झाडून हत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शविविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
पोलीस दलावर ग्रेनेडने हल्ला
काल (शुक्रवारी) रात्री ही घटना घडली. या हत्येमागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेनंतर परिसरात शोध मोहीम राबवण्यात येत आहे. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात येत असल्याचाी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेडने हल्ला केला होता. यामध्ये एक जवान जखमी झाला होता. ही घटना पादशाही बाग परिसरात घडली. अहमदउल्ला असे जखमी पोलिसाचे नाव असून तो हेड कॉन्स्टेबल होता.
सुरक्षा यंत्रणांसाठी दहशतवादी नवे आव्हान
जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांसाठी दहशतवादी हे नवे आव्हान बनले आहे. गेल्या २ महिन्यांत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंगच्या ६ घटना घडल्या. दहशतवाद्यांचा हा नवा मार्ग असून हत्या करणारे बहुतांश दहशतवादी हे लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असल्याचे जम्मू काश्मीर पोलिसांचे म्हणणे आहे. १३ मे रोजी दहशतवाद्यांनी रियाझ अहमद नावाच्या जवानाची हत्या केली होती. रविवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना रियाझच्या हत्येत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना ठार केले.
६ दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल सातत्याने दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावत आहेत. यापूर्वी सुरक्षा दलांनी ६ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीरमधील कुलगा चकमकीत बँक मॅनेजर विजय कुमारचा मारेकऱ्यालाही कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. तसेच शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले.