ऑस्ट्रेलियातील रेडमंड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका ७७ वर्षीय व्यक्तीवर पाळीव कांगारूने हल्ला केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. संबंधित मृत व्यक्ती विरळ लोकवस्ती असणाऱ्या रेडमंड शहरात राहत होती. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीची सविस्तर माहिती अद्याप मिळाली नसून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियन पोलिसांनी मंगळवारी सांगितलं की, गेल्या ८६ वर्षात कांगारूने माणसावर हल्ला केल्याची ही पहिलीच घटना आहे. रविवारी दुपारी एक व्यक्ती घराच्या आवारात जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रुग्णवाहिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संबंधित कांगारू रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांना मृत व्यक्तीच्या दिशेनं जाण्यापासून रोखत होतं. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संबंधित पाळीव कांगारूला ठार केलं आहे.

कर्मचारी हल्ला झालेल्या व्यक्तीजवळ केले असता, त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचं आढळून आलं आहे. एक दिवस अगोदर कांगारूने संबंधित व्यक्तीवर हल्ला केला असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी १९३६ साली कांगारूने एका ३८ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला होता.

सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, विल्यम क्रिकशँक असं त्यावेळी हल्ला झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. विल्यम यांच्यावर कांगारूने हल्ला केल्यानंतर त्यांना काही महिने न्यू साउथ वेल्समधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. याठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. एका मोठ्या कांगारूच्या तावडीतून दोन कुत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न विल्यम यांनी केला होता, यावेळी कांगारूने त्यांच्यावरच हल्ला चढवला. या हल्ल्यात विल्यम यांचा जबडा तुटला होता, तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.