एकीकडे देशात सर्वच राजकीय पक्षांना लोकसभा निवडणुकांचे वेध लागलेले असताना दुसरीकडे नितीश कुमार पुन्हा भाजपाच्या गोटात गेल्याची जोरजार चर्चा सुरू झाली आहे. नितीश कुमार यांचं हे पाऊल विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानलं जात आहे. नितीश कुमार यांच्यावर सातत्याने बाजू बदलण्याचा ठपका या घडामोडींमुळे अधिक गडद झाला आहे. मात्र, तसं असलं, तरी नितीश कुमार यांच्या सोबत येण्यामुळे भाजपाला जागांच्या बाबतीत फारसा काही फायदा होणार नाही, असा दावा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत उत्तर भारतातलं चित्र नेमकं कसं असेल? याविषयी चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नितीश कुमार यांनी भाजपासोबत जाण्यामुळे नेमका काय परिणाम होईल? असा प्रश्न प्रशांत किशोर यांना इंडिया टुडेच्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाच्या उत्तरादाखल प्रशांत किशोर यांनी त्यांचं विश्लेषण मांडलं.

“भाजपाला फारसा फायदा नाही”

“नितीश कुमार विरोधकांच्या इंडिया आघाडीत राहिल्यामुळे त्यांना जागांच्या बाबतीत फारसा फायदा झाला नसता. तशीच स्थिती भाजपाचीही आहे. भाजपालाही नितीश कुमार यांना सोबत घेतल्यामुळे फारसा फायदा होणार नाही. मात्र, नितीश कुमार हे इंडिया आघाडीतील एक महत्त्वाचे घटक असल्याचं मानणाराही एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना सोबत घेण्यामागे भाजपाची मोठं युद्ध जिंकण्याआधी एखादी लढाई हरण्यासारखी खेळी असू शकते. नितीश कुमार भाजपासोबत आल्यामुळे त्यांच्याविषयीचं व पर्यायाने इंडिया आघाडीविषयीचं मत बदलण्याच भाजपाला यश येईल”, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.

“राहुल गांधींच्या यात्रेसाठीची ही सगळ्यात चुकीची वेळ”, प्रशांत किशोर यांची सूचक टिप्पणी; म्हणाले, “निर्णय न घेणं…”

“नितीश कुमार इंडिया आघाडीतले महत्त्वाचे घटक”

नितीश कुमार इंडिया आघाडीतले महत्त्वाचे घटक असल्यामुळेच त्यांना भाजपाने आपल्यासोबत घेतल्याचं विश्लेषण प्रशांत किशोर यांनी मांडलं आहे. “नितीश कुमार यांच्याकडे इंडिया आघाडीमध्ये विरोधकांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे कळीचे नेते म्हणून पाहिलं जात होतं. त्यामुळे इंडिया आघाडीच्या चाणक्यांपैकी एकाला बाहेर काढल्यामुळे भाजपानं इंडिया आघाडीला एक प्रकारे मानसिक धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. पण त्यांनी हा पर्याय निवडला कारण कदाचित ते अंतिम युद्ध जिंकण्यासाठी ही लढाई हरण्यासाठी तयार झाले असावेत”, असं प्रशांत किशोर म्हणाले.

बिहारमधील जागांचं नेमकं गणित काय?

नितीश कुमार भाजपासोबत गेल्यामुळे कुणाला कसा फायदा किंवा तोटा होऊ शकतो, याबाबत प्रशांत किशोर यांनी आकडेवारीच्या आधारे अंदाज वर्तवला आहे. “२०१४मध्ये भाजपानं स्वबळावर ३२हून जास्त जागा जिंकल्या. २०१९मध्ये भाजपानं १७ जागा जिंकल्या. यावेळी भाजपा व रालोआ यांची साधरण कामगिरी चांगली दिसत आहे. त्यामुळे बिहारमध्ये जागा वाढवण्यासाठी भाजपानं नितीश कुमार यांना पुन्हा सोबत घेतलेलं नाही. उलट जर तुम्ही पाहिलं तर यानंतर भाजपाच्या स्वत:च्या जागा कमी होण्याची शक्यताच जास्त आहे. कारण आता ते बिहारमध्ये कमी जागा लढवतील”, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political analyst prashant kishor on nitish kumar joins bjp amid loksabha election 2024 pmw