पुढील काही दिवसांमध्ये निवृत्त होत असलेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी पाकिस्तानमध्येच लष्कराविरोधात चालवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. १९७१ साली भारताविरुद्ध झालेल्या बांगलादेश युद्धासंदर्भातील काही माहिती दुरुस्त करण्याची गरज असल्याचं विधान त्यांनी आपल्या लष्करप्रमुख म्हणून आपल्या शेवटच्या सार्वजनिक भाषणामध्ये केली आहे.
बांगलादेशचं युद्ध हे राजकीय अपयश होतं लष्करी नाही, असं बाजवा यांनी म्हटलं आहे. १९७१ साली बांगलदेशामधील पाकिस्तानी लष्कराची कामगिरी आणि त्याविषयीची चर्चा करण्याचं टाळलं जातं असंही बाजवा म्हणाले आहेत. “मला इथे काही गोष्ट स्पष्ट करायच्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानासंदर्भातील चूक ही राजकीय होती लष्करी नाही,” असं बाजवा यांनी म्हटल्याचं ‘डॉन’ वृत्तपत्रानं म्हटलं आहे.
बाजवा यांनी बांगलादेश युद्धामध्ये पाकिस्तानचे ३४ हजार सैनिक सहभागी झाले होते असाही दावा केला आहे. पाकिस्तानी सैनिकांची संख्या ही ९२ हजार नव्हती तर ३४ हजार इतकी होती. इतर लोक हे सरकारी विभागांमधील होते. पाकिस्तानच्या ३४ हजार सैनिकांचा भारतीय लष्कराच्या अडीच लाख आणि ‘मुक्ती बाहिनी’च्या दोन लाख सदस्यांसमोर निभाव लागला नाही, असा दावाही बाजवा यांनी केला.
“या अशा सर्व परिस्थितीमध्येही आपल्या लष्कराने शौर्याने लढा दिला. आपल्या लष्कराने दिलेल्या बलिदानाची भारतीय लष्कराचे तत्कालीन प्रमुख फिल्ड मार्शल माणेकशा यांनीही दखल घेतली होती,” असं बाजवा म्हणाले. पाकिस्तानने स्वत: हे हौतात्म अद्याप स्वीकारलेलं नाही. हा हुतात्मा झालेल्या सैनिकांवर झालेला अन्याय आहे, असंही बाजवा यांनी म्हटलं.
“आज बोलण्यासाठी मिळालेल्या संधीचा फायदा घेत मी या शहीदांना सलाम करतो आणि यापुढेही करत राहीन. ते आपले आदर्श आहेत आणि आपल्याला त्यांचा अभिमान हावा,” असं बाजवा यांनी भाषणाच्या शेवटी म्हटलं.
बाजवा हे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निवृत्त होत आहे. २०१६ साली त्यांची तीन वर्षांसाठी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. नंतर त्यांना तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती.