राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याची आमची इच्छा नाही, मात्र भारतीय जनता पक्षाने आपल्या राजकीय धोरणांत आमूलाग्र बदल केल्यास आम्हाला तसा कटू निर्णय घ्यावा लागेल, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता नसलेल्या नेत्याच्या हाती भाजपने नेतृत्व सोपविले व सर्वसमावेशक राजकारणाला तिलांजली दिल्यास निवडणुकीत त्याचा फटका बसेल, असा इशारा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी येथे दिला. राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनात ते बोलत होते. नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करताच टीका करणे त्यांनी पसंत केले.
या अधिवेशनात शरद यादव यांची सलग तिसऱ्यांदा पक्षाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
दरम्यान, भाजपने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार येत्या वर्षअखेपर्यंत घोषित करावा, अशी मागणीही या अधिवेशनात करण्यात आली.
मी शर्यतीत नाही
पंतप्रधानपदासाठी सध्या अनेक नेते इच्छूक असले तरी मी त्या शर्यतीत नाही, असा खुलासा नितीश यांनी केला.
‘तो’ निर्णय भाजपच्या संसदीय समितीचा
नरेंद्र मोदी हे लोकप्रिय नेते आहेत, मात्र ते आमच्या पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील की नाही, हे मी सांगू शकत नाही. या बाबतचा निर्णय आमची संसदीय समिती घेईल, अशी स्पष्टोक्ती भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केली. या निर्णयानंतर कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही, रालोआतील कोणताही घटक पक्ष बाहेर पडणार नाही, याची मला खात्री आहे, असे ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा