एरवी एकमेकांच्या विरोधात बोलणारे काँग्रेस आणि भाजपचे नेते माध्यमांच्या विरोधात बोलताना मात्र एकत्र आले होते. राजकीय पक्षांमध्ये दुफळी निर्माण करण्यास लोकशाहीचा हा चौथा स्तंभ जबाबदार असल्याचा सूर आळवत, ज्या वेळी महत्त्वाच्या धोरणांबाबत चर्चा होते, त्या वेळी माध्यमांना दूर ठेवावे, असे मत केंद्रीयमंत्री जयराम रमेश आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
माध्यमांना जेव्हा आम्ही दूर ठेवतो तेव्हा सहमती घडवण्यात यश येते. केंद्रातील काँग्रेस सरकारने सकारात्मक चर्चेसाठी विरोधकांना कधीही विश्वासात घेतले नाही, असा आरोप गडकरी यांनी केला. त्यावर माध्यमांनाच सहमती नको असते, असे मतरमेश यांनी व्यक्त केले. जोपर्यंत महत्त्वाच्या मुद्दय़ावर निर्णय होत नाही, तोपर्यंत माध्यमांना दूरच ठेवावे, असे मत गडकरींनी व्यक्त केले. माध्यमे काही वेळा त्याचा विपर्यास करतात, त्यातून राजकीय नेत्यांमध्ये वाद होतात, असे मतही या दोघांनी व्यक्त केले. जर राजकीय नेत्यांमध्ये सहमती असेल तर बातमी कशी होणार, असा सवाल त्यांनी केला.
माध्यमांवरून या नेत्यांमध्ये सहमती असताना राजकीय घराणेशाही, भाजपची राजकीय भूमिका तयार करण्यात संघाचा हात या विषयांवर मतभेद निर्माण झाले. काँग्रेस हा एका कुटुंबाचा पक्ष झाल्याची टीका गडकरींनी केली. त्यावर संघ भाजपमध्ये हीच भूमिका बजावतो, असे उत्तर रमेश यांनी दिले. २०१४ च्या निवडणुका व्यक्तीभोवती नव्हे तर विचारांवर व्हाव्यात, अशी अपेक्षा रमेश यांनी व्यक्त केली. विचारसरणी, जाहीरनामे यांना केवळ औपचारिक स्वरूप यायला नको, अशी सूचना त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा