आणीबाणीचा निर्णय चुकीचाच होता. इंदिरा गांधी आणि काँग्रेसने यासाठी माफी देखील मागितली होती, असे नमूद करतानाच नरेंद्र मोदींची हिटलरसोबत तुलना करणे चुकीचे आहे, असे परखड मत काँग्रेस नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओत त्यांनी आणीबाणी, महिला सुरक्षा याबाबत मत व्यक्त केले. आणीबाणीबाबत ते म्हणाले, आणीबाणी चुकीचा निर्णय होता, इंदिरा गांधी आणि काँग्रेसने यासाठी माफी मागितली होती. सर्वप्रथम राजकीय पक्षांनी नेत्यांची तुलना हिटलरशी करणे थांबवले पाहिजे. भाजपाने इंदिरा गांधींची तर काँग्रेसने नरेंद्र मोदींची तुलना हिटलरशी करणे चुकीचे आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात हिटलरसारखा नेता येणे अशक्य आहे. एखाद्याने एकाधिकारशाही आणण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याचे प्रयत्न हाणून पाडले जातील, असे त्यांनी सांगितले.

देशात अजूनही सेन्सॉरशिप आहे. इंदिरा गांधी यांच्या काळापेक्षा आता जास्त सेन्सॉरशिप सध्याच्या काळात आहे. सरकार आणि पंतप्रधानांनीच यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. मोठ्या कंपन्या, मनोरंजन सृष्टी, खासगी क्षेत्रातील मोठे अधिकारी, सामाजिक संस्था यांच्याशी त्यांनी चर्चा करुन कुठे कुठे सेन्सॉरशिप आहे, याचा आढावा घेतला पाहिजे. मगच यावर तोडगा शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.