देशातील राजकीय नेते, काही महत्वाच्या व्यक्ती तसेच संरक्षण संस्था राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयएच्या पोलीस महानिरिक्षकांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

एनआयएने दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील विविध १७ ठिकाणी बुधवारी छापे टाकल्यानंतर आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या ‘हरकत-उल-हर्ब-इस्लाम’ या नव्या मॉड्यूलचा खुलासा झाला आहे. एनआयएला मोठा कट उधळण्यात यश आले आहे. या कारवाईनंतर एनआयएने पत्रकार परिषद घेऊन अधिक खुलासा केला आहे.

एनआयएच्या माहितीनुसार, मुफ्ती सोहेल असे आयसिसच्या या नव्या मॉड्युलच्या म्होरक्याचे नाव आहे. तो दिल्लीचा रहिवासी असून मुळचा उत्तर प्रदेशातील अमरोहा इथला आहे. यापूर्वी अमरोहा येथे तो एका मशिदीमध्ये काम करत होता. ज्या प्रकारे या दहशतवाद्यांची तयारी सुरु होती ते पाहता काही दिवसांत रिमोट कन्ट्रोलद्वारे विविध ठिकाणी स्फोट घडवून आणण्याचा त्यांचा डाव होता. हे आयसिसच्या प्रेरणेने तयार झालेले नवे मॉड्युल असून ते परदेशी एजंटच्या संपर्कात होते. त्यांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

दिल्लीच्या सीलामपूर आणि उत्तर प्रदेशातील अमरोहा, हापूर, मीरत आणि लखनऊ येथे एनआयएने छापे टाकले आहेत. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचे साहित्य, हत्यारं आणि दारुगोळा तसेच देशी बनावटीचे रॉकेट लॉन्चरही जप्त करण्यात आले आहे.

त्याचबरोबर ७.५ लाख रुपये, सुमारे १०० मोबाईल फोन्स, १३५ सिम कार्ड्स, लॅपटॉप आणि मेमरी कार्डही या छाप्यात जप्त करण्यात आले आहेत. इतरही आणखी काही भागात एनआयएकडून छापेमारी सुरुच आहे. १६ संशयितांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर १० आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Story img Loader