लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यातील एकूण ४२८ जागांवर मतदान पूर्ण झालं आहे. आता केवळ दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. अशातच आता ४ जूनरोजी काय होणार? याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजपाला ४०० जागा मिळणार की इंडिया आघाडीचे सरकार येणार असे एक ना अनेक मुद्दे या चर्चांच्या केंद्रस्थानी आहेत. दरम्यान, याबाबत आता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले प्रशांत किशोर?

प्रशांत किशोर यांनी नुकताच एनडीटीव्हीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना ४ जून रोजीच्या निकालाबाबतही विचारण्यात आलं. याबाबत बोलताना, ४ जून रोजी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. तसेच २०१९ प्रमाणे भाजपाला ३०० किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त जागा मिळतील असं भाकीतही त्यांनी वर्तवलं.

प्रशांत किशोर म्हणाले, “पूर्व आणि दक्षिण भारतात भाजपाच्या जागा आणि मतांची टक्केवारी दोन्ही वाढताना दिसून येत आहे. दक्षिण पूर्व भागात भाजपाच्या १५ -२० जागा वाढण्याची शक्यता आहे. शिवाय उत्तर पश्चिम भागातही भाजपाचे फार काही नुकसान होईल, असं वाटत नाही.”

हेही वाचा – “…तर राहुल गांधींनी राजकारणातून बाजूला व्हावं”, प्रशांत किशोर यांचा सल्ला

“भाजपाच्या रणनीतीपुढे विरोधक फसले”

“लोकांमध्ये भाजपाविरोधात नाराजी असली हा राग व्यापक स्वरुपात दिसलेला नाही. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीचा निकाल बघितला तर भाजपाला २७२ जागा मिळणार नाही, असा दावा केला जात होता. मात्र, यावेळी भाजपाच्या बाजुने दावे केले जात आहेत. ४०० जागांच्या रणनीतीमुळे विरोधक पूर्णपणे फसले आहेत”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

“…तोपर्यंत वेळ निघून गेली होती”

“जोपर्यंत इंडिया आघाडी सक्रीय झाली, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. ज्या जागांवर भाजपा कमजोर आहे, त्या जागांवर भाजपाने योजना बनवली. इंडिया आघडीची घोषणा झाल्यानंतर काही महिने त्याबाबत अनिश्चितता होती. त्यांनी पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचीदेखील घोषणा केली नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदींविरोधात इंडिया आघाडीकडे सक्षम चेहरा नाही, असा समज जनतेत निर्माण झाला. त्याचा फायदा भाजपाला झाला”, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा – आदित्य ठाकरे, अखिलेश यादव हे वाईट समभाग; प्रस्थापितांची जागा कोण घेणार? प्रशांत किशोर स्पष्टच म्हणाले…

“विरोधक कमजोर आहे म्हणणं चुकीचं”

“भारतात विरोधक कमजोर आहे, असा दावा केला जातो. मात्र हे सत्य नाही. सद्यस्थिती बघता, देशात विरोधक कमजोर आहे आणि मोदी सरकार सगळे खुश आहे, असं म्हणणं धाडसाचे ठरेल. आजपर्यंत देशपातळीवर कोणत्याही पक्षाला ५० टक्के मते मिळालेली नाही. विशेष म्हणजे जनतेने सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांना जास्त मते दिली आहेत. ज्यावेळी या देशात सीएए-एनआरसी कायदा लागू करण्यात आला, त्यावेळी देशात विरोधापक्षांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली. त्यामुळे देशात विरोधक नाहीत किंवा ते कमजोर आहे, असं म्हणणं चुकीचं आहे”, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political strategist prashant kishor statment on 4 june result said modi will come to power spb