Tushar Gandhi Controversial Statement: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केरळमध्ये केलेल्या एका विधानावरून आता राज्यातलं आणि त्याअनुषंगाने राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण रंगू लागलं आहे. केरळमध्ये या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकाच बाजूला आले असून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. त्याचवेळी भाजपा व आरएसएसकडून तुषार गांधी यांच्या विधानावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
तुषार गांधी यांनी गुरुवारी केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये दिवंगत गोपीनाथन नायर यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमात तुषार गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS वर परखड शब्दांत टीका केली. तसेच, भाजपाचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.
“आपण भारतीय जनता पक्षाचा पराभव करू शकतो, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विष आहे. ते या देशाचा आत्माच नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला या घडामोडींची भीती वाटायला हवी. कारण जर आत्माच नष्ट झाला, तर सारंकाही नष्ट होईल”, असं तुषार गांधी या कार्यक्रमात म्हणाले होते.
मी माफी मागणार नाही – तुषार गांधी
दरम्यान, भाजपा व आरएसएसनं यावर तीव्र संताप व्यक्त करताना विधानाबद्दल माफी मागण्याची मागणी केली. ती तुषार गांधींनी धुडकावून लावली. “त्यांची इच्छा आहे की मी जे काही म्हणालो त्याबद्दल माफी मागावी. माझं विधान मागे घ्यावं. पण मी म्हणालो मी ते करणार नाही. मी जेव्हा काही बोलतो, तेव्हा मी त्याबद्दल माफी मागावी लागेल किंवा ते विधान मागे घ्यावं लागेल असा विचार अजिबात करत नाही”, असं तुषार गांधी म्हणाले.
सत्ताधारी व विरोधक एकवटले!
यासंदर्भात आता माकप व काँग्रेस हे केरळमधील सत्ताधारी तुषार गांधींच्या बाजूने भूमिका मांडू लागले असून आरएसएसला लक्ष्य करत आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी तुषार गांधींवरील टीका म्हणजे देशाच्या धर्मनिरपेक्षता व लोकशाही तत्वांवरील हल्ला असल्याची टीका केली आहे.
“हे अस्वीकारार्ह आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणारी कृती लोकशाही व्यवस्थेमध्ये चालवून घेता कामा नये. अशा प्रकारच्या वृत्तींविरोधात कायदेशीर व लोकशाही मार्गांनी कारवाई केली जाईल. तुषार गांधींविरोधातील कारवायांवरून हे दिसतंय की आंदोलकांची मानसिकता ही महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांशी मिळतीजुळती आहे. याविरोधात धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही समाजातून परखड विरोध उमटायला हवा”, असं पिनरायी विजयन म्हणाले.
काँग्रेसचा आरएसएसवर हल्लाबोल
दरम्यान, केरळमधील विधानसभा विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी हा थेट महात्मा गांधींचा अवमान असल्याचं नमूद केलं आहे. “अशा प्रकारची आंदोलनं करणाऱ्यांविरोधात राज्य सरकार व पोलिसांनी कठोर कारवाई करायला हवी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक कर्करोग असून तो देशाच्या आत्म्यामध्ये पसरला आहे या तुषार गांधींच्या विधानात काहीच चुकीचं नाही. या देशात फॅसिझमचं राज्य आहे. हे राज्य देशाचा आत्मा खाऊन टाकत आहे. हे सत्य सांगितल्याबद्दल तुषार गांधी यांचा अवमान केला जात आहे”, अशा शब्दांत काँग्रेसनं परखड भूमिका मांडली आहे.