साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या संदर्भात बोलताना आम्ही वाचूपण, नाचूपण अशी भूमिका संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी घेतली असली, तरी या संमेलनात नाचण्याचेच काय, वाचण्याचे कामही राजकीय नेत्यांकडेच असल्याचे दिसत असल्याची कडवट प्रतिक्रिया आता संमेलन नगरीतून उमटत आहे. घुमान साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर राजकीय नेत्यांनी आपली प्रतिमा उंचावण्यासाठी करून घेतल्याचे बोलले जात असून, त्याच्या पुष्टय़र्थ उद्घाटन सोहळ्याच्या वेळी व्यासपीठावर झालेली राजकारण्यांची गर्दी, त्यांची राजकीय स्वरूपाची भाषणे, एवढेच नव्हे तर संमेलनस्थळी वाटण्यात आलेली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामांची पंजाबी कौतुकपुस्तिका यांचे दाखले दिले जात आहेत.   
या साहित्य सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर नेहमीप्रमाणेच मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भाऊगर्दी होती. त्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, पंजाबचे मुख्यमंत्री सुरजितसिंह बर्नाला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार असे ज्येष्ठ राजकीय नेतेही व्यासपीठावर होते. त्यात ‘उत्सवमूर्ती’ संमेलनाध्यक्ष अगदीच झाकोळले गेल्याचे चित्र दिसले. डॉ. सदानंद मोरे यांचे अध्यक्षीय भाषण सुरू असताना प्रसंगाचे गांभीर्य पाळण्याचे भानही व्यासपीठावरील काही जणांना राहिले नाही. त्यांचे भाषण सुरू असताना चाललेली ऊठबस आणि जा-ये साहित्यप्रेमींना खटकणारी होती. उद्घाटन समारंभात झालेली गडकरी आणि पवार यांची भाषणेही बव्हंशी राजकीय स्वरूपाची होती. पंजाबचे मुख्यमंत्री सुरजितसिंह बर्नाला यांच्याशी आपले कसे चांगले संबंध आहेत, आपण त्यांच्यावर केलेले उपकार, लोंगोवाल करार यांचे गुणगान पवार यांनी गायले. त्यांच्या भाषणानंतर बर्नाला यांनी आपल्या भाषणात, लोंगोवाल करार केला वगरे ठीक आहे, पण त्यांनी आम्हाला फसविले, असे सांगत ‘राजकीयदृष्टय़ा योग्य’ राहण्याचा प्रयत्न केला. गडकरी यांनी तर आपण केलेली रस्त्यांची कामे, घुमान चौपदरी रस्ता अशा साहित्यबाह्य़ गोष्टींवरच भर दिला. याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
संमेलननगरीत वाटण्यात आलेली राज्य सरकारची कौतुकपुस्तिका हाही साहित्यप्रेमींमधील चर्चेचा विषय होता. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र माहिती केंद्रातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीची माहिती देणारी पंजाबी भाषेतील ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली असून, तिचे प्रकाशन शुक्रवारी प्रकाशसिंह बादल यांच्या हस्ते संमेलन नगरीतील ‘व्हीआयपी’ कक्षात करण्यात आले. त्यानंतर ती सर्व उपस्थितांना वाटण्यात आली. महाराष्ट्रातील विकासकामांची पंजाबी जनतेला माहिती व्हावी, या चांगल्या हेतूनेच ही पुस्तिका पंजाबी भाषेतून काढण्यात आली असल्याचे माहिती केंद्राचे संचालक दयानंद कांबळे यांनी सांगितले. संमेलनाच्या परिसरातही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामांची माहिती देणारे पंजाबी भाषेतील फलक लावण्यात आले आहेत.
मातबर साहित्यिकांची अनुपस्थिती
साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यातील अनेक माजी संमेलनाध्यक्ष आणि मान्यवर साहित्यिक व कवी यांची अनुपस्थिती हा मंडपात चच्रेचा विषय झाला होता. माजी संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे आणि मावळते संमेलनाध्यक्ष फ. मु. िशदे यांचा अपवाद वगळता अन्य एकही माजी साहित्य संमेलनाध्यक्ष या वेळी हजर नव्हते.  अपवाद वगळता मातबर साहित्यिकांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा