भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील सभेत झालेल्या स्फोटांचे राजकारण आता सुरू झाले असून भाजप आणि लोकजनशक्ती पार्टीने या मुद्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना थेट लक्ष्य केले आहे. या स्फोटांची नैतिक जबाबदारी स्वीकारून नितीश यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लोजपाचे प्रमुख रामविलास पासवान यांनी केली, तर केंद्राने इशारा देऊनही नितीश सरकारने सभेला पुरेशी सुरक्षा दिली नाही, असा आरोप भाजपचे नेते अरुण जेटली यांनी केला.
पाटणा येथे झालेल्या स्फोटांमुळे राज्यातील राजकीय कार्यक्रमांना पुरेशी सुरक्षा देण्यात राज्य सरकार अपयशी पडल्याचे सिद्ध झाले आहे. तीन महिन्यांपूर्वी बोधगया येथे झालेल्या स्फोटांतून सरकारने धडा घेतला नसून राज्यातील सुरक्षा अद्यापही जैसे थे आहे, त्यामुळे या स्फोटांची नैतिक जबाबदारी स्वीकारून नितीश यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा, असे पासवान पाटण्यात म्हणाले.
 दुसरीकडे, मोदी यांची राज्यात सभा असताना नितीशकुमार यांनी अत्यंत ढिसाळ सुरक्षा व्यवस्था पुरवली. मोदीच नव्हे तर सर्वच भाजप नेत्यांच्या सुरक्षिततेबाबत नितीशकुमार यांनी दाखविलेली असंवेदनशीलता अत्यंत निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी नोंदवली. पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जेटली म्हणाले की, मोदींच्या सभेच्या दिवशी दहशतवादी घातपात घडविण्याची माहिती गुप्तहेर खात्याने नितीशकुमार यांना खूप दिवसांपूर्वी दिली होती. नितीशकुमार यांनी मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केले. भाजप नेत्यांनीदेखील नितीशकुमार यांना सुरक्षा व्यवस्थेसंबंधी सूचना दिल्या होत्या, तरीही नितीशकुमार यांनी सूचनेला गांभीर्याने घेतले नाही.

मोदींच्या सुरक्षेत हयगय नाही
नवी दिल्ली : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले नरेंद्र मोदी यांच्या हुंकार रॅलीत बॉम्बस्फोट झाल्यानंतर आता केंद्र सरकारने नरेंद्र मोदी यांना पुरेशी सुरक्षा पुरवली असल्याचा दावा केला आहे. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले, की केंद्र सरकारने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे व त्यांना नॅशनल सिक्युरिटी गार्ड कमांडोजची (एनएसजी) सुरक्षा २४ तास दिलेली आहे.

गृहमंत्र्यांना बॉलिवूड अधिक प्रिय
पाटण्यातील बॉम्बस्फोट मालिकेनंतर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ताबडतोब तेथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याची गरज होती. मात्र, त्याऐवजी त्यांनी मुंबईत बॉलिवूडच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. वर तेथे उशिरा पोहोचल्याबद्दल आयोजकांची माफीही मागितली.
मुरली मनोहर जोशी, भाजप नेते.

राहुल यांनी वक्तव्याबाबत पुरावे द्यावेत
राहुल गांधी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाषा बोलू लागले आहेत. पाकिस्तानच्या आयएसआयने मुझफ्फरनगरमधील दंगलपीडितांशी संपर्क साधल्याच्या आपल्या दाव्याचे पुरावे त्यांनी सादर करावेत, अथवा ते विधान मागे घ्यावेत.
    – आझम खान,
सपा नेते व उत्तर प्रदेशचे मंत्री
(मुझफ्फरनगर दंगलींसंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाबाबत बोलताना)