संयुक्त जनता दलातील बंडखोरांनी पक्षाच्या कारवाईविरोधात आता थेट न्यायालयात दाद मागितली आहे.पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत रेणू कुशवा आणि अनू शुक्ला यांना पक्षांतरबंदी कायद्याखाली सदस्यत्व का रद्द करू नये, यासाठी नोटीस बजावली आहे. त्यांना उद्यापर्यंत विधानसभा अध्यक्षांना उत्तर द्यायचे आहे, तर पाटणा उच्च न्यायालयात याबाबतची सुनावणी उद्याच होण्याची शक्यता आहे. कुशवा यांनी कोणतेही पक्षविरोधी कृत्य केले नसल्याचा दावा केला आहे. कुशवा या नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात होत्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी कुशवा आणि शुक्ला यांच्यासह चौघा आमदारांना जनता दलाने निलंबित केले होते. कुशवा आणि सुजाता देवी या आमदारांचे पती भाजपमध्ये आले आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर जनता दलापुढे संकट आहे. पक्षाच्या अनेक आमदारांनी अपक्ष उमेदवार अनिल शर्मा आणि साबीर अली यांना पाठिंबा दिला आहे
झा यांच्याकडून स्वामींची माफी
नवी दिल्ली:काँग्रेस प्रवक्ते संजय झा यांनी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांची बिनशर्त माफी मागितली आहे. झा यांनी ट्विटरवर स्वामी यांचा उल्लेख सीआयएचा हस्तक असा केला होता. त्यावर स्वामी यांनी झा यांच्या विरोधात तीन कोटी रुपयांचा दावा भरला होता.२५ एप्रिलला हा ट्विट झा यांनी केला होता. स्वामी यांची बदनामी करण्याचा उद्देश नव्हता असे झा यांनी सांगितले. स्वामी यांच्याबद्दल आदर असल्याचे झा यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. विकिलीक्सने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीच्या आधारे आपण हा निष्कर्ष काढल्याचे झा यांनी मान्य केले. मात्र ते वाचण्यात आणि अर्थ समजून घेण्यात चूक झाल्याचे झा यांनी मान्य करत दिलगिरी व्यक्त केली आहे.
‘विजेच्या प्रश्नावर  भाजपचे राजकारण’
रांची: झारखंडमध्ये भाजप जास्तीत जास्त काळ सत्तेवर असूनही राज्यात एक युनिट विजेचीही निर्मिती करण्यास सरकार अपयशी ठरल्याची टीका काँग्रेसने केली आहे. विजेच्या प्रश्नावरून भाजप राजकारण करीत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.आम्हाला वीज हवी आहे, मात्र भाजप केवळ या प्रश्नावर राजकारण करीत आहे. भाजपची सत्ता या राज्यात दीर्घकाळ असतानाही राज्यात एक युनिटही वीजनिर्मिती करण्यात येत नाही, असे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शैलेश सिन्हा यांनी म्हटले आहे. केंद्रातील यूपीए सरकारने दिलेल्या निधीचा तत्कालीन भाजप सरकारने योग्य वापर केला असता तर आता विजेचा प्रश्नच निर्माण झाला नसता. भाजप सरकारने विजेसाठी २८ सामंजस्य करार केले आहेत, मात्र कोणीही वीजनिर्मिती केलेली नाही, असे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश गुप्ता यांनी म्हटले आहे.
अन्न सुरक्षा कायद्यात वंचित लाभार्थ्यांचा समावेश करा-पासवान
पाटणा: जे लाभार्थी अन्न सुरक्षा कायद्याच्या कक्षेत येत असूनही त्यांना त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे अशा ६० टक्के लाभार्थ्यांचा योजनेत समावेश करावा, अशी सूचना अन्न आणि ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांना केली आहे.
आपण सोमवारी सकाळी मांझी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि त्यांना ६० टक्के लाभार्थ्यांचा समावेश करण्याची विनंती केली, असे पासवान यांनी सांगितले.बिहारमध्ये १.५८ कोटी कुटुंब अन्न सुरक्षा कायद्याच्या कक्षेत आहेत. ग्रामीण कुटुंब ८५ टक्के तर शहरी कुटंब ७५ टक्के असे प्रमाण आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांची तपासणी केल्यानंतर पासवान यांनी सूचना केली.गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सवलतीच्या दरातील अन्न मिळत नसल्याच्या तक्रारी आल्याचेही आपण मांझी यांना सांगितले.

Story img Loader