पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या खालच्या दर्जाचे राजकारण करीत असून आपण फॅनी वादळाने राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत विचारपूस करण्यासाठी दूरध्वनी केला तेव्हा त्यांनी बोलण्याचे टाळले, त्यांनी वादळावरही राजकारण केले अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
‘संयुक्त राष्ट्रांनी मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित केले तेव्हा त्याचे कौतुक ममता बॅनर्जी यांनी केले नाही, कारण त्याचा मतांवर परिणाम होईल अशी भीती त्यांना वाटली. ओदिशातील परिस्थितीची मी नुकतीच हवाई पाहणी केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही मी दूरध्वनीवर संपर्क साधून चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझ्याशी बोलणेच टाळले. मी त्यांच्या फोनची उत्तरादाखल वाट पाहिली पण त्यांनी फोन केलाच नाही. दीदींना राजकारणात जास्त रस आहे. मी राज्याच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो संपर्कही राज्य सरकारने होऊ दिला नाही.’
पश्चिम बंगालमध्ये तुम्ही जय श्रीराम म्हणालात तर तुम्हाला तुरुंगात टाकले जाईल अशी परिस्थिती आहे, अशा शब्दात मोदी यांनी ममता यांच्यावर टीका केली.
ममतांचे प्रत्युत्तर
मोदी यांनी वादळग्रस्त ओदिशाचा दौरा केल्यानंतर आपल्याला कलाइकुंडा येथे भेटीसाठी बोलावले होते. मात्र ते बोलावतील तेथे जाण्यासाठी आम्ही त्यांचे नोकर आहोत काय? निवडणुकीच्या काळात मी मुदत संपलेल्या पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर का जावे, असा प्रश्न ममतांनी विचारला.