देशातील आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने अतिश्य महत्वपूर्ण ठरणारी घटना समोर आली आहे. निवडणूक आयोगाकडून नऊ मार्च रोजी मतदार नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या एकदिवसीय मोहिमेत तब्बल ७४.५० लाख लोकांनी मतदार म्हणून स्वत:च्या नावाची नोंद करत एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. यासंदर्भात बोलताना निवडणूक अधिका-यांनीसुद्धा देशात आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी मोहिमेला प्रतिसाद मिळाल्याची कबुली दिली आहे. निवडणूक आयोगाकडून नऊ मार्च रोजी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत देशभरातील ९.३ लाख मतदान केंद्रांवर ७४,५६,३६७ लोकांनी मतदार नोंदणीसाठी आवश्यक असलेला फॉर्म क्र.६ भरून दिल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये उत्तरप्रदेश राज्यातून सर्वाधिक १५.४ लाख नवमतदारांनी आपल्या नावाची नोंद केली आहे. त्यामागोमाग आंध्रप्रदेशमध्ये ११ लाख, तामिळनाडूत ९.९ लाख, बिहारमध्ये सात लाख, महाराष्ट्रात ४.७ लाख, राजस्थानमध्ये ४.५ लाख, गुजरात राज्यात ३.३ लाख आणि कर्नाटकमध्ये तब्बल ३ लाख नवमतदारांनी निवडणूक यादीत आपले नाव नोंदविण्यासाठी उत्साह दाखविला. यापैकी प्रत्यक्ष मतदान यादीत किती जणांचा समावेश होणार हे पडताळणी प्रक्रियेवर अवलंबून असले तरी साधारणपणे निवडणूक आयोगाकडून बहुतांश अर्ज स्विकारले जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी दिली.

Story img Loader