प्रगती आणि महासत्तेचा मुकुट हिरावून घेण्याची शक्ती असलेल्या चीनबाबत अमेरिकेला डोळे वटारण्यासाठी नवे कारण मिळणार आहे. आपल्या वस्तूंनी जगासोबत अमेरिकेचेही कानाकोपरे भरणारे चीन अमेरिकेत प्रदूषणाचीही प्रचंड भर पाडत आहे. अमेरिकेतील वाढत्या हवा प्रदूषणास तेथील चंगळवादी संस्कृती हे एक प्रमुख कारण असले तरी चीनमुळे होणारे पॅसिफिक महासागराच्या परिसरातील प्रदूषण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत येते, असे एका अभ्यास अहवालात म्हटले आहे. अमेरिकेने चीनमध्ये वस्तू उत्पादित करून त्यानंतर आपल्या देशात आयात करण्याचे धोरण ठेवले आहे. प्रत्यक्षातील स्थितीनुसार चीन या उच्च दर्जाच्या निर्यातक्षम वस्तूंबरोबर प्रदूषणही अमेरिकाला निर्यात करीत आहे.

कॅलिफोर्निया, ओरेगॉन, वॉशिंग्टन व पोर्टलँड येथील एकचतुर्थाश प्रदूषके ही चीनमधून येतात, कारण तेथे दूरचित्रवाणी संच, खेळणी, स्मार्टफोन, स्वस्त कपडे व इतर अनेक निर्यातक्षम वस्तू बनवण्याचे कारखाने आहेत. तेथील सगळी प्रदूषके अमेरिकेत येतात. बीजिंगच्या पेकिंग विद्यापीठाचे जिंताय लिन हे या शोधनिबंधाचे प्रमुख लेखक आहेत. या अभ्यासात सल्फर डायॉक्साइड व नायट्रोजन ऑक्साइड यांचे प्रमाण किती आहे याचाही अभ्यास करण्यात आला. या सर्व प्रदूषकांपैकी २१ टक्के प्रदूषके ही निर्यातक्षम उत्पादनांच्या कारखान्यातून बाहेर पडतात. या वस्तू चीनमधून अमेरिकेला निर्यात केल्या जातात, असे नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस प्रोसीडिंगच्या नोंदीत म्हटले आहे. गेल्या दोन दशकांपासून दक्षिण कोरिया आणि जपान या दोन्ही शेजारी राष्ट्रांना चीनमधील उद्योग निर्माण करीत असलेल्या प्रदूषणाचा मोठा फटका बसत आहे.

चीनचे प्रदूषण इतर देशांतील हवा कशी प्रदूषित करीत आहे यावर आयर्विन येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे वैज्ञानिक स्टीव्ह डेव्हिस यांनी  सादर केलेल्या शोधनिबंधात ते म्हणतात, की आमच्या अभ्यासानुसार चीनमध्ये अनेक निर्यातक्षम वस्तू उत्पादित होतात, परंतु त्यांच्या उत्पादन प्रक्रियेतून २२ टक्के कार्बन मोनॉक्साइड व १७ टक्के काळा कार्बन बाहेर पडतो. काळा कार्बन ही विशेष चिंतेची बाब असण्याचे कारण म्हणजे ती काजळी वातावरणात राहते व पावसाबरोबर वाहून जात नाही, ती हवेत तरंगत कितीही लांब अंतर जाते. त्यामुळे कर्करोग, हृदयरोग, अस्थमा हे रोग जडतात.

आपण उत्पादनाचे आऊटसोर्सिग केले, पण चीनमधील बरेच प्रदूषण पॅसिफिकमार्गे आपल्याच देशावर (अमेरिकेवर) वाईट परिणाम करीत आहे. – स्टीव्ह डेव्हिस, वैज्ञानिक