दिवाळीच्या दोन दिवसात राजधानी दिल्ली आणि परिसरात (NCR)मध्ये हवेच्या प्रदूषणाने कहर केला आहे. हवेच्या गुणवत्तेची पातळी घसरली असून सकाळी सुर्यदर्शन हे उशीरा झाले, वातावरणात सगळीकडे धूर पसरल्याचं चित्र होतं.

दिल्लीच्या या प्रदूषणाला आता राजकीय वळण मिळालं आहे. दिल्ली राज्य सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी या प्रदूषणाला भाजप जवाबदार असल्याची टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राय म्हणतात “सर्वसामान्य लोकांनी अनेक ठिकाणी फटाके लावले नाहीत. याबाबत आम्ही मोहिम राबवली होती. मात्र काही ठिकाणी हे झालं नाही. भाजपच्या लोकांनी फटाके लावले, जाणुनबूजुन लावले, यामुळे रात्री अचानक प्रदूषणाचा स्तर वाढला “.

प्रदूषणाचा स्तर हा आणखी एका घटनेमुळे वाढला असल्याचंही पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी मान्य केलं आहे. दिल्ली जवळच्या पंजाब-हरियाणामध्ये शेतीची कामे ही लांबली आहेत. पीक काढून झाल्यावर पुढील पीक घेण्याआधी जमिनीत उरलेली पराळी ही जाळली जाते. सध्या ही कामे जोरात सुरु असल्याने निर्माण झालेला धूर हा राजधानी दिल्लीच्या वातावरणात पसरला आहे. यामुळे प्रदूषण वाढलं असल्याचं पर्यावरण मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

असं असलं तरी सध्या दिल्लीच्या वातावरणात असलेला प्रदूषणाचा स्तर हा गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत जरा कमी असल्याची माहिती दिल्ली राज्य सरकारने दिली आहे. ही समाधानकारक गोष्ट असली तरी हवेची घसरलेली गुणवत्ता हा दिल्लीकरांच्या आरोग्यासाठी घातकच आहे.

Story img Loader