पोलंडमधील परिषदेत संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांचे आवाहन
हवामान बदल रोखण्यासाठी सध्या होत असलेले प्रयत्न अतिशय तोकडे असून या समस्येचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा वेळ निघून गेलेली असेल असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी हवामान परिषदेच्या उदघाटनप्रसंगी दिला. अलिकडच्या काळातील टोकाच्या हवामान घटनांवर चिंता व्यक्त करतानाच हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सागरी पातळीतील वाढ, विध्वंसक दुष्काळ याचा फटका बसत असलेले देश संयुक्त राष्ट्रांच्या पोलंड येथील हवामान शिखर बैठकीत श्रीमंत राष्ट्रांना हवामान बदलाविरोधातील लढाईत नेटाने सामील होण्याचे आवाहन करतील अशी अपेक्षा आहे. पॅरिस हवामान करारातून अमेरिकेने माघार घेतल्याने आधीच हवामान बदल रोखण्यासाठीच्या प्रयत्नांना मोठा फटका बसला असताना ही परिषद सोमवारपासून येथे सुरू झाली. फिजी, नायजेरिया व नेपाळ या देशांना हवामान बदलांचा मोठा धोका असून २०१५ च्या पॅरिस करारातील आश्वासनांची पूर्तता करण्याचा आग्रह हे देश धरणार आहेत. पोलंड हा यजमान असला तरी तो देश कोळसा या इंधनावर विसंबून आहे. जीवाश्म इंधनापासून दूर जाण्याचा त्यांचाही संकल्प आहे पण तो फारसा ठोस नाही, त्यामुळे यापुढे काही दशके पोलंड प्रदूषण करीत राहील असे टीकाकारांचे म्हणणे आहे.
पॅरिस करारात जागतिक तापमानवाढ ही दोन अंशांच्या खाली किंवा शक्य असल्यास दीड अंश सेल्सियसच्या खाली ठेवण्याचा संकल्प करण्यात आला होता. पोलंड येथे होत असलेल्या हवामान शिखर बैठकीस एकूण दोनशे देशांचे प्रतिनिधी आले असून ते एक आठवडाभर हवामान बदल रोखण्यासाठीच्या उपायांवर चर्चा करतील. या प्रयत्नांमध्ये जो पैसा उभा करावा लागणार आहे तो कुणी उभा करायचा हा सर्वात वादाचा मुद्दा यात आहे.
पॅरिस करारानुसार श्रीमंत देश हे ऐतिहासिक हरितगृह वायू उत्सर्जनास जबाबदार असून त्यांनी विकसनशील देशांना प्रदूषण रोखण्यासाठी पैसा दिला पाहिजे. पण अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस करारातून माघार घेतली असून एकवेळ त्यांनी हवामान बदल हे थोतांड असल्याची टीकाही केली होती. विकसनशील देशांना आम्ही कुठले पैसे देणे लागत नाही असेही त्यांनी म्हटले होते. जागतिक बँकेने सोमवारी २०० अब्ज डॉलर्सचा निधी हवामान कृती गुंतवणुकीसाठी जाहीर केला होता. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारी मदतीचा मार्ग काहीसा प्रशस्त होणार आहे. पृथ्वीच्या केवळ एक अंश तापमानवाढीने काही ठिकाणी पूर, काही ठिकाणी दुष्काळ, काही ठिकाणी वणवे, पिकांची हानी व वादळे, सागराची वाढती पातळी असे प्रकार होत आहेत. त्यामुळे आताच प्रदूषण व इतर घातक कृती रोखल्या नाहीत तर पृथ्वीची अवस्था आणखी वाईट होऊन मग त्यातून बाहेर पडणे कठीण होणार आहे, संयुक्त राष्ट्रांच्या एका समितीने याबाबत ऑक्टोबरमध्ये धोक्याचा इशारा दिला होता.