केरळची तुलना सोमालियाशी केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ट्विटरकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले. केरळच्या विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेदरम्यान मोदींनी हे वक्तव्य केले. मुलभूत आणि आवश्यक आरोग्याच्या बाबतीत केरळपेक्षा सोमालियामधील परिस्थिती चांगली आहे, असे मोदींनी म्हटले. यानंतर मुख्यमंत्री ओम्मन चंडी यांच्यासह विरोधकांनी मोदींवर जोरदार टीका केली. मोदी यांनी राज्याचा अपमान केला आहे, मोदी यांनी राजकीय सभ्यता दाखवावी आणि आपले विधान मागे घ्यावे, असे चंडी यांनी म्हटले.
संपूर्ण साक्षर असलेल्या केरळ राज्यातील नेटिझन्सने खास करून सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधानांवर टीकेची झोड उठवली. ट्विटरवरील टॉप ट्रेंड्समध्ये ‘पो मोने मोदी‘ ( #PoMoneModi ) हा टॅग आज खूप चर्चेत राहिला. ‘पो मोने मोदी‘
एका मल्याळम चित्रपटातील ‘पो मोने दिनेशा‘ हे अत्यंत प्रसिद्ध वाक्य आहे. हा डायलॉग वापरून चिडलेल्या मल्याळम नागरिकांनी मोदींना लक्ष्य केले. या वाक्याचा अर्थ ‘बाळ, तू तर कामातून गेलास, सरळ घरी जा‘ असा आहे.

Story img Loader