Pope Francis पोप फ्रान्सिस यांची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. पोप फ्रान्सिस यांना न्यूमोनिया झाला आहे. तसंच मागच्या २४ तासांमध्ये त्यांची प्रकृती ढासळली आहे. त्यांना ऑक्सिजन सिलिंडरद्वारे ऑक्सिजन दिला जातो आहे. १४ फेब्रुवारीला पोप फ्रान्सिस यांना रोमच्या जेमेली या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना श्वसनविकार जडला असून त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांना न्युमोनियाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.

८८ वर्षीय पोप फ्रान्सिस यांच्यावर जेमेली रुग्णालयात उपचार सुरु

८८ वर्षीय पोप फ्रान्सिस यांना न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे गेल्या आठवड्यापासून रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोप आजारी असल्याने आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने व्हॅटिकनमधील सध्याची परिस्थिती काहीशी गंभीर आहे.

पोप यांची वैद्यकीय स्थिती नाजूक

पोप फ्रान्सिस यांना शुक्रवारी रोम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती बिघडल्याने आणि त्यांची वैद्यकीय स्थिती नाजूक असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जोपर्यंत आवश्यकता वाटेल तोपर्यंत ते रुग्णालयातच राहतील असे व्हॅटिकन सिटीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं होतं. ब्राँकायटिससंदर्भातील चाचण्या आणि उपचार करण्यासाठी त्यांना दाखल करण्यात आलं. आता पोप यांना न्युमोनिया झाल्याचं व्हॅटिकनच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. त्यानंतर प्रकृतीबाबत पुन्हा अपडेट देण्यात आलं. त्यानंतर पोप यांच्यावर ठरलेले उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं तसंच त्यांना ताप नसल्याचं सांगण्यात आलं. तसंच त्यांनी सोमवारी रुग्णालयात काही काम आणि वाचन केल्याचंही सांगितलं गेलं होतं. मात्र शनिवारी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

१२ वर्षांच्या काळात पोपना अनेकदा रुग्णालयात

रोमन कॅथलिक चर्चचे नेतृत्व करताना १२ वर्षांच्या काळात पोपना अनेक वेळा रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे. त्यांनी जीवनातही अनेक वैद्यकीय समस्यांचा सामनाही करावा लागला. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांचं एक फुफ्फुस काढावं लागलं होतं. मार्च २०२३ मध्ये त्यांना ब्राँकायटिसमुळंच तीन दिवस रुग्णालयात दाखल राहावं लागलं होतं. त्यानंतर जून महिन्यात त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रियाही करण्यात आली. आणखी एका आजारपणामुळं त्यांना २०२३ मध्ये यूएईमध्ये झालेल्या हवामान परिषदेलाही उपस्थित राहता आलं नव्हतं.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात हनुवटीला जखम

डिसेंबर महिन्यात सेंट पीर्ट्स बासिलिका याठिकाणी कॅथलिक कॉर्डिनलसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, त्यांच्या हनुवटीवर एका जखमेचे व्रणही दिसले होते. पडल्यामुळं झालेल्या लहानशा अपघातात ती जखम झाल्याचं नंतर व्हॅटिकनकडून सांगण्यात आलं होतं.

Story img Loader