Pope Francis पोप फ्रान्सिस यांचं निधन झाल्याची माहिती व्हॅटिकनकडून देण्यात आली आहे. सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य रोम येथील चर्चच्या सेवेसाठी वेचलं. पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला आयुष्यातली मूल्यं शिकवली. तसंच धैर्य आणि प्रेम यांचा संदेश दिला असं म्हणत व्हॅटिकनने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. आता पोप यांचा उत्तराधिकारी कोण असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान पोप यांचं अखेरचं भाषणही चर्चेत आलं आहे.
काय होतं पोप यांचं अखेरचं भाषण?
बंधूंनो आणि भगिनींनो तुम्हाला ईस्टरच्या खूप खूप शुभेच्छा अशी घोषणा पोप फ्रान्सिस यांनी सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या गॅलरीतून केली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. प्रकृती अस्वस्थ असल्याने पोप फ्रान्सिस यांनी ईस्ट मासमध्ये सहभाग घेतला नाही. पण त्यांनी लहान मुलांना आशीर्वाद दिले. तसंच Viva il Papa आणि Bravo या घोषणा दिल्या. ज्यामुळे उपस्थितांना आश्चर्य वाटलं. पोप फ्रान्सिस यांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून त्यांना न्यूमोनियाने ग्रासलं होतं. मात्र ईस्टरच्या दिवशी पोप फ्रान्सिस यांनी बॅसिलिका येथील गॅलरीतून ईस्टरच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. सगळ्या जगाचं हित होवो अशाही शुभेच्छा त्यांनी दिल्या आणि युक्रेन, गाझा, कांगो, म्यानमार यांसह जिथे जिथे संघर्ष सुरु आहे तिथे शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रार्थना केली.
युद्धविरामाचं केलं आवाहन
पोप फ्रान्सिस म्हणाले, “ज्या ज्या ठिकाणी युद्ध सुरु आहे त्यांनी त्या युद्धांना विराम द्यावा, बंधकांना सोडवावं आणि शांततेच्या भविष्याकडे वाटचाल करावी. उपासमारीने झगडणाऱ्या लोकांना मदत करावी, समाजातील उपेक्षित घटकांचं कल्याण करावं, त्यांच्याबाबत सहानुभूती बाळगावी. आपण सगळे एकाच ईश्वराची मुलं आहोत यावर विश्वास ठेवा आणि देवावरचा आपला विश्वास दृढ करा.”या आशयाचा संदेश पोप फ्रान्सिस यांनी जमलेल्या लोकांना दिला.
पोप फ्रान्सिस यांना श्वास घेण्यासाठी होत होता त्रास
पोप फ्रान्सिस यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. दोन महिन्यांपासून ते आजारी होते. आजारपणात गर्दीमध्ये जाऊ नका असं त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र गुरुवारपासून म्हणजेच ईस्टरच्या चार दिवस आधीपासून त्यांनी लोकांच्या भेटीगाठी घेणं काही प्रमाणात सुरु केलं होतं. गुरुवारी ते रोम येथील तुरुंगात जाऊन तिथल्या कैद्यांनाही भेटले होते. पोप फ्रान्सिस यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र हळूहळू त्यांची प्रकृती सुधारल्याचंही दिसून येत होतं. रविवारी नाकाला लावण्यात येणाऱ्या कॅन्युलाशिवाय त्यांनी जमलेल्या लोकांना काही वेळासाठी संबोधित केलं होतं. त्यावेळी त्यांचा आवाज काहीसा खालावला होता पण तो स्पष्ट होता. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. आज सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पोप फ्रान्सिस यांची प्राणज्योत मालवली.