Pope Francis : पोप फ्रान्सिस यांचं निधन झाल्याची माहिती व्हॅटिकनकडून देण्यात आली आहे. सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य रोम येथील चर्चच्या सेवेसाठी वेचलं. पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला आयुष्यातली मूल्यं शिकवली. तसंच धैर्य आणि प्रेम यांचा संदेश दिला असं म्हणत व्हॅटिकनने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. AP ने पोप फ्रान्सिस यांचं निधन झाल्याची माहिती दिली आहे. व्हॅटिकनकडून एक व्हिडीओ संदेश देण्यात आला. त्या संदेशात पोप फ्रान्सिस यांच्या निधनाचं वृत्त देण्यात आलं.

पोप फ्रान्सिस यांचं सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी निधन

रोमन कॅथलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकन पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. फेब्रुवारी महिन्यात रोम येथील जेमेली रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती आधी ढासळली होती पण नंतर हळूहळू त्यांची प्रकृती सुधारली आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आज सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पोप फ्रान्सिस यांची प्राणज्योत मालवली.

२०१३ मध्ये पोपपदी निवड

कार्डिनल जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ यांची २०१३ मध्ये बेनेडिक्ट सोळावे यांचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यांना पोप फ्रान्सिस म्हटलं जातं. पोपपदी येणारे युरोपबाहेरचे ते पहिले पोप ठरले होते. २६६ व्या पोपपदी त्यांची निवड झाली त्यावेळी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

१२ वर्षांच्या काळात पोप अनेकदा रुग्णालयात

रोमन कॅथलिक चर्चचे नेतृत्व करताना १२ वर्षांच्या काळात पोप फ्रान्सिस यांना अनेकवेळा रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. तसंच अनेक वैद्यकीय समस्यांचा सामनाही करावा लागला. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांचं एक फुफ्फुस काढावं लागलं होतं. मार्च २०२३ मध्ये त्यांना ब्राँकायटिसमुळंच तीन दिवस रुग्णालयात दाखल राहावं लागलं होतं. त्यानंतर जून महिन्यात त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रियाही करण्यात आली. आणखी एका आजारपणामुळं त्यांना २०२३ मध्ये यूएईमध्ये झालेल्या हवामान परिषदेलाही उपस्थित राहता आलं नव्हतं.

पेंट हाऊस नाकारल्यानेही चर्चेत आले होते पोप फ्रान्सिस

आतापर्यंतचे सर्व पोप हे व्हॅटिकन सिटीतील भलंमोठं पेंट हाऊस अपार्टमेंट वापरत असत. परंतु, पोप फ्रान्सिस यांनी ते पेंट हाऊस नाकारलं आणि स्वतःसाठी गेस्ट हाऊसमधील छोटंसं घर निवडलं होतं. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचीही चर्चा झाली होती. पोप फ्रान्सिस यांनी जागतिक अर्थव्यवस्थेत परवलीचा शब्द असलेल्या मुक्त-बाजार या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. चर्चने समलिंगी लोकांबद्दल मत बनवण्यापेक्षा त्यांची माफी मागितली पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या भूमिकांमुळेही ते चर्चेत राहिले.