जगभरात फास फूड रेस्टॉरंटचे जाळे उभारणाऱ्या सबवे (Subway) या कंपनीचे माजी सहसंस्थापक पीटर बक (Peter Buck) यांनी मृत्यूपूर्वी सबवे ब्रँडची ५० टक्के संपत्ती दान केली होती, अशी माहिती समोर आली आहे. फोर्ब्स मासिकाने याबाबत माहिती दिली आहे. पीटर बक यांनी ही संपत्ती पीटर आणि ल्युसिया फाऊंडेशन (PCLB) या संस्थेला दान केली आहे. १९९९ साली पीटर आणि त्यांची पत्नी ल्युसिया यांनी या संस्थेची स्थापना केली होती. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार दान केलेल्या संपत्तीचे मूल्य हे ५ बिलियन डॉलर असल्याचे सांगण्यात येते.
पीसीएलबी चॅरिटेबल फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक कॅरी शिंडेल यांनी सांगितले, “फाऊंडेशनच्या समाजपयोगी कामांचा विस्तार करण्यासाठी हे दान देण्यात आले आहे. यामुळे अनेकांच्या आयुष्यातील अडचणी सोडवून त्यांना मदत करता येणार आहे. डॉ. बक यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सुरुवातीपासून काम केले आहे. या दानाच्या माध्यमातून आम्हाला शैक्षणिक क्षेत्रात आणखी विद्यार्थ्यांना मदत करता येणार आहे.”
सबवे कंपनीला १० बिलियन डॉलरमध्ये विकण्यात येणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. त्यानंतर फोर्ब्सकडून ही माहिती समोर आणण्यात आली आहे. बक यांच्या मृत्यूपत्रात त्यांचे पुत्र क्रिस्टोफर आणि विलियम यांच्यासोबत पीसीएलबीचे अधिकारी बेन बेनोइट यांना त्यांच्या संपत्तीचे राखणदार म्हणून नेमण्यात आले आहे.
२०२१ रोजी झाला होता मृत्यू
पीटर बक हे अणुविज्ञान शास्त्रज्ञ होते. सहा दशकांपूर्वी त्यांनी फ्रेड डीलुका यांच्यासोबत एकत्र येऊन सबवे या सँडविच रेस्टॉरंटची स्थापना केली होती. डीलुका यांचे २०१५ साली तर बक यांचे २०२१ रोजी निधन झाले होते. बक यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांची वैयक्तिक संपत्ती १.७ अब्ज डॉलर असल्याची माहिती फोर्ब्सने दिली होती. बक यांचे पीसीएलबी फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, पत्रकारिता, संशोधन यासह अनेक क्षेत्रातील गरजवंत लोकांना मदत केली जाते.