पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अजूनही कायम असल्याचा दावा सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केला. ते सोमवारी अलहाबाद येथे सुरू असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे सांगितले. भारतीय राजकारण हे सध्या महत्त्वपूर्ण वळण घेत आहे. भाजप केंद्रस्थानी आल्यामुळे २०१४ हे वर्ष भारतीय राजकारणातील महत्त्वाचे वर्ष ठरले होते. आज दोन वर्ष उलटूनही मोदी सरकारची लोकप्रियता कायम आहे, असे जेटली यांनी सांगितले. याशिवाय, भाजपने यापूर्वी कमकुवत असलेल्या भागातही स्वत:ची ताकद वाढवली आहे. त्यामुळे भारतीय राजकारण बदलत असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, भाजपची यंदाची कार्यकारिणी बैठकही मोदीमय ठरली. मागील वर्षी दिल्लीत झालेल्या बैठकीत व्यंकय्या नायडू यांनी मोदी म्हणजे भारताला मिळालेली दैवी देणगी असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून विरोधकांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यंदाच्या बैठकीत ही भूमिका नितीन गडकरी यांनी पार पाडली. मोदींची दूरदृष्टी आणि वैचारिकतेमुळे भाजपची दक्षिण आणि ईशान्य भारतात वाढ झाल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. या बैठकीत मोदी सरकारच्या गेल्या दोन वर्षातील यशस्वी कामगिरीची प्रशंसा करणारा ठरावही मंजूर करण्यात आला. हा ठराव भाजपच्या आजवरच्या परंपरेला छेद देणारा ठरला. आजवरच्या इतिहासात भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत आर्थिक आणि राजकीय असे दोनच ठराव मंजूर केले जात असत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा