केजरीवालांच्या आंदोलनाचा फटका
तीन महिन्यांपूर्वीपर्यंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जातील तिथे प्रसिद्धीमाध्यमे त्यांचा पाठलाग करायचे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी जंतरमंतरवर झालेल्या शेवटच्या आंदोलनात वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांच्या  दोन-तीनशे प्रतिनिधींसह हजारोंच्या जमावाला अण्णांनी मंत्रमुग्ध केले होते, पण आता परिस्थिती बदलली आहे. अण्णा हजारे दिल्लीत आले तरी त्यांची फारशी दखल घेतली जात नाही. अण्णांचा दिल्लीतील टीआरपी झपाटय़ाने घसरला आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय पक्षस्थापनेच्या घोषणेमुळे टीम अण्णा दुभंगल्यानंतर भ्रष्टाचाराविरोधात पुनश्च हरिओम करण्यासाठी अण्णा हजारे यांना दिल्लीत कार्यालय थाटायचे आहे. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरातील कार्यकर्ते व समर्थकांना येण्याजाण्यास सोयीचे ठरेल, अशी जागा त्यांना कार्यालयासाठी शोधायची आहे. अर्थात, कार्यालय थाटण्याची अण्णांना घाई नाही. त्याआधी त्यांना नव्या कार्यकर्त्यांसह भ्रष्टाचारविरोधी संघटनेची समन्वय समिती स्थापन करायची आहे.
मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र सदन येथे अण्णा हजारे यांनी किरण बेदी आणि सुनीता गोधरा यांच्यासह आपल्या नव्या कार्यकर्त्यांसोबत बंद सभागृहात जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनाची नवी दिशा ठरविण्यासाठी चर्चा केली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशीही बोलणार होते, पण प्रसिद्धीमाध्यमांना अण्णांचे पूर्वीसारखे आकर्षण उरलेले नाही. अण्णांमागे ओबी व्हॅन्सनिशी झुंडीने धावणारे पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन यांची महाराष्ट्र सदनात एक दशांशानेही उपस्थिती नव्हती. सात-आठ कॅमेऱ्यांचे स्टँडस्, पाच-सहा पत्रकार असा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या अण्णांची निराशा करणारा माहोल महाराष्ट्र सदनात बघायला मिळत होता.

Story img Loader