सक्तीचे धर्मांतर आणि अत्याचारामुळे पाकिस्तानमधील हिंदूंची लोकसंख्या घटली आहे. १९४७ मध्ये पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या लोकसंख्येचे प्रमाण २३ टक्के होते. हे प्रमाण आता ६ टक्क्यांवर आले असून दरवर्षी सुमारे ५ हजार हिंदू भारतात पलायन करत असल्याची आकडेवारीही समोर आली आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करुन त्यांचे बळजबरीने मुस्लिम तरुणांशी लग्न लावून दिले जाते. यानंतर या मुलींचे धर्मांतरही केले जात आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात हिंदूची संख्या सर्वाधिक असून या भागात हिंदूंना लक्ष्य करण्याचे प्रमाणही दिवसेगणिक वाढत आहे. हिंदू मुलींचे धर्मांतर करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे पाकिस्तानमधील एका वृत्तापत्रात म्हटले आहे. कनिष्ठ जातीतील हिंदूचे सक्तीने धर्मांतर केले जाते. तर उच्चवर्णीय हिंदूंचे अपहरण करण्याचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार स्थानिक हिंदू संघटनांनी केली आहे.

पाकिस्तानने त्यांच्या देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्माचे अनुकरण करण्याची मुभा दिली आहे. प्रत्येक नागरिकाचे मूलभूत हक्क अबाधित राहतील असे पाकने म्हटले आहे. पण प्रत्यक्षात पाकिस्तानमध्ये हिंदूंची गळचेपी होत आहे.

एका सामाजिक संघटनेच्या अहवालानुसार पाकिस्तानमधील दरवर्षी सुमारे एक हजार मुलींना सक्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडले जाते. सिंध प्रांतात हे प्रमाण सरासरी महिन्याला २० मुली एवढे आहे. पाकिस्तानमधील हिंदूंना गोपुजेवरुन हिणवले जाते. त्यांची खिल्ली उडवली जाते. मात्र यामुळे आपण हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत असल्याचे त्यांना जाणवत नाही’ याकडे पाकमधील हिंदूंसाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनांनी लक्ष वेधले. ‘प्रत्येक हिंदू हा भारतीय नसतो आणि प्रत्येक भारतीय हा हिंदू नसतो हे पाकिस्तानमधील नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे’ असे या संघटनेचे कार्यकर्ते सांगतात. पाकमधील हिंदूवर होणाऱ्या अत्याचारामुळे दरवर्षी ५ हजार हिंदू कुटुंब भारतात आश्रय घेण्यासाठी पलायन करत असल्याची आकडेवारीसमोर आली आहे.