Port Blair Andaman and Nicobar Capital Name Changed : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी (१३ सप्टेंबर) एक मोठी घोषणा केली. केंद्र सरकारने अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं आहे. पोर्ट ब्लेअर बंदर हे आता ‘श्री विजयपुरम’ या नावाने ओळखलं जाणार आहे.
अमित शाह यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे. या संकल्पापासून प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचं नाव ‘श्री विजयपुरम’ असं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्री विजयपुरम’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यामधील अंदमान निकोबरचं योगदान दर्शवत राहील”.
गृहमंत्री शाह म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि इतिहासात या बेटाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चोल सम्राटांनी या बेटांवरच त्यांच्या नौदलाचे तळ उभारले होते. हे बेट भारताच्या सुरक्षेला व विकासाला गती देण्यासाठी सज्ज झालं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या बेटावर भारताचा तिरंगा फडकवला होता. वीर सावरकर व इतर स्वातंत्र्यसैनिकांनी भारतमातेला गुलामीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठीचा मोठा लढा इथेही उभारला होता. हे बेट त्या स्वातंत्र्यलढ्याची साक्ष देत आहे.
‘आर्चीबाल्ड ब्लेअर’ यांच्या सन्मानार्थ ईस्ट इंडियाने ठेवलेलं ‘पोर्ट ब्लेअर’ हे नाव
इंग्रजांनी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांना, वास्तूंना दिलेली नावं मोदी सरकार बदलत आहे. केंद्राने आतापर्यंत अनेक शहरांची नावं बदलली आहेत. त्यात आता पोर्ट ब्लेअरचं नाव समाविष्ट झालं आहे. पोर्ट ब्लेअर हे बंदर आता श्री विजयपुरम या नावाने ओळखलं जाईल. १७८९ साली ईस्ट इंडिया कंपनीने आर्चीबाल्ड ब्लेअर (Archibald Blair) यांच्या सन्मानार्थ या बेटाचं नाव पोर्ट ब्लेअर असं ठेवलं होतं, जे आता मोदी सरकारने बदललं आहे.
हे ही वाचा >> Supreme Court On CBI : केजरीवाल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे सीबीआयला खडेबोल; “बंद पिंजऱ्यातील पोपट नाही, हे सिद्ध करा”
पोर्ट ब्लेअरला कसं जायचं?
पोर्ट ब्लेअर हे भारतातलं एक सुंदर बेट आहे. विशाखापट्टनम, कोलकाता व चेन्नईवरून जहाजाने पोर्ट ब्लेअरला जाता येतं. पोर्ट ब्लेअरला पोहोचण्यासाठी विशाखापट्टनमहून ५६ तास, चेन्नईवरून ६० तास व कोलकात्याहून ६६ तास प्रवास करावा लागतो. यासह दिल्ली, कोलकाता, मुंबई व हैदराबदवरून विमानाने पोर्ट ब्लेअरला जाता येतं.